संपूर्ण देश करोना साथीच्या अभूतपूर्व संकटाशी झगडत असून, ही परिस्थिती राज्या-राज्यातील असमतोल कमी करणारा परिणाम साधणारी असेल, असे स्टेट बँकेच्या संशोधन अहवाल ‘इकोरॅप’चे प्रतिपादन आहे. अर्थात यामागे संपन्न राज्यांची हानी ही या संकटापायी गरीब राज्यांच्या तुलनेत अधिक असेल, असे गृहीतक आहे.

कोणत्याही देश व भौगोलिक प्रदेशाचा उत्पन्न स्तर मोजण्याचे साधन म्हणजे दरडोई उत्पन्नाची सरासरी ही संपूर्ण देशस्तरावर ५.४ टक्क्यांनी घटून, १.४३ लाख रुपये या पातळीवर येईल. साथीचे संकट सरल्यावर, संपूर्ण देश एक स्तरावर येईल, म्हणजे गरीब राज्ये ही श्रीमंत राज्यांची काही प्रमाणात बरोबरी करू शकतील, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. अहवालाच्या मते, विद्यमान २०२०-२१ आर्थिक वर्षांत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ६.८ टक्के इतके आक्रसू शकेल. तर साथ येण्यापूर्वी असलेला अर्थवृद्धी दर गाठण्यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत वाट पाहावी लागेल, असाही अहवालाचा निष्कर्ष आहे.

अहवालाच्या मते, कोणत्याही मोठा आघात करणाऱ्या प्रसंगानंतर दिसून येणारा हा परिणाम आहे. अशाच प्रकारच्या असमतोलात घसरणीचा अनुभव यापूर्वी एकसंध जर्मनीनेही १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर अनुभवला आहे.

भारतात दरडोई उत्पन्नाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा उच्च स्तर असलेल्या श्रीमंत राज्यांतील नागरिकांचे दरडोई उत्पन्न करोनापश्चात लक्षणीय घसरलेले दिसेल. अखिल भारतीय स्तरावरील दरडोई उत्पन्नातील सरासरी घसरण जरी ५.४ टक्के अंदाजण्यात येत असली तरी दिल्ली (-१५.४ टक्के) आणि चंडीगड

(-१३.९ टक्के) या राज्यांमध्ये घसरणीचे प्रमाण त्यापेक्षा तीन पट इतके असेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नांत (जीडीपी) ४७ टक्के वाटा असणाऱ्या आठ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दरडोई उत्पन्न दोन अंकी प्रमाणात घसरताना दिसेल, असे हा अहवाल सांगतो.

महाराष्ट्रात दोन अंकी घसरण

करोनाची साथ ओसरल्यानंतर (जेव्हा पूर्णपणे ओसरेल तेव्हा) महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि तमिळनाडू या आर्थिक-औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या राज्यात दरडोई उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत १०-१२ टक्के  घसरलेले दिसून येईल. त्या उलट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा अशा राष्ट्रीय सरासरीपेक्षा नेहमीच कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्यांमध्ये घसरणीचे प्रमाण आठ टक्के वा त्याहून कमी असेल. या राज्यातील तुलनेने अल्प शहरीकरण, हरित पट्टय़ाची मुबलकता व शेतीची कामे अबाधित राहिल्याने हे शक्य होणार आहे.