भारतीय हवाई क्षेत्रातील स्पर्धा वेग धरत असतानाच स्वस्तातील हवाई सेवेचा प्रारंभ करून नव्याने दाखल झालेल्या एअर एशिया इंडियाने तिच्या दरांमध्ये आणखी २० टक्क्यांची कपात केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कंपनीने तिच्या मर्यादित हवाई सेवांसाठी ही योजना जाहीर केली आहे.
१२ ऑगस्टपासूनच ही सवलत योजना अमलात आली असून, तिचा लाभ येत्या १७ ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. कंपनीमार्फत देशांतर्गत तीन ठिकाणांसाठी होणाऱ्या उड्डाणांचा लाभ यामार्फत हवाई प्रवाशांना घेता येईल. १४ डिसेंबपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्यांना १७ ऑगस्टपर्यंत प्रवासाची नोंदणी करून आगाऊ तिकीट आरक्षित करता येईल.
एअर एशिया इंडियामार्फत सध्या बंगळुरूहून चेन्नई, कोची आणि पणजी (गोवा) उड्डाणे केली जातात. कंपनी बंगळुरू ते जयपूर व बंगळुरू ते चंडीगडदरम्यान आपली हवाई सेवा सुरू करणार आहे. यानुसार बंगळुरू ते उपरोक्त शहरांसाठीची सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
टाटा समूहाची भागीदारी असलेल्या एअर एशिया इंडियाने व्यवसायाला सुरुवात करतानाच स्पर्धकांच्या तुलनेत ३५ टक्के तिकीट दर कमी ठेवले आहेत. त्यातही आता २० टक्क्यांची कपात करण्यात आल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट देत कंपनीने हवाई वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र केल्याचे मानले जात आहे.