केंद्र सरकारने मोबाइल फोनवरील सीमाशुल्क वाढविल्याचा परिणाम अ‍ॅपलच्या आयफोन तसेच मनगटी घडय़ाळावर झाला आहे. अमेरिकी कंपनीने आयफोनच्या किंमती ३.६ टक्क्य़ांपर्यंत वाढविल्या आहेत. तर अ‍ॅपल वॉच ७.९ टक्क्य़ांनी महाग झाले आहे.

अ‍ॅपलचा ३५६ जीबीचा आयफोन एक्सची कमाल किरकोळ किंमत ३,२१० रुपयांनी वाढून १,०८,९३० रुपये झाली आहे. तर आयफोन६ आता ३१,९०० रुपयांना असेल.  भारतात तयार होणाऱ्या आयफोन एसई २६,००० (३२ जीबी) व ३५,००० रुपये (१२८ जीबी) अशी स्थिर असेल, असे अ‍ॅपलने स्पष्ट केले आहे. तर ३८ मिमी अ‍ॅपल घडय़ाळ ३२,३८० रुपये व ४२ मिमी घडय़ाळ ३४,४१० रुपयांना उपलब्ध असेल.

अर्थमंत्री जेटली यांनी २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर करताना फोनवरील सीमाशुल्क वाढवित असल्याचे जाहीर केले होते. आयात फोनवरील शुल्क सरकारने दोन महिन्यात दोनदा वाढविले आहे. स्थानिक मोबाइल उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आयात फोनवरील शुल्क २० टक्के केले.