* मकरंद जोशी

करोनाच्या धामधुमीच्या काळात संपूर्ण आर्थिक जगतात प्रचंड वेगाने आर्थिक उलथापालथ होत आहे. त्या वेगाने आपल्या व्यवहाररचनेत बदल करत करत प्रत्येक उद्योजकाला या काळात स्वत:ला आणि उद्योगाला तारून न्यायचं आहे आणि या संकटाच्या परीक्षेतून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण व्हायचं आहे. मागील ७ – ८ लेखातून मी या विषयावर भाष्य करत आलो आहे. मागील आठवडय़ात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अनेक योजना जाहीर केल्या. टाळेबंदी लागू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आपल्या उद्योगाविषयी सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.

१) सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाचे नोंदणीकरण

आपल्या सर्व लहान, मोठय़ा उद्योग / व्यवसायाचं टरटए अंतर्गत नोंदणीकरण केले आहे का? त्याच्या नव्या परिभाषेप्रमाणे उद्योग सूक्ष्म, लघू, मध्यम यापैकी कोणत्या श्रेणीत मोडतो? या प्रश्नांची २०१९ – २० च्या ताळेबंदानुसार चाचपणी करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या उद्योगाचे टरटए नोंदणीपत्र आपल्या बँक, आपले ग्राहक (सरकारी किंवा गैरसरकारी) यांच्याकडे केले आहे का? [नोंद : सर्व टरटए पुरवठादारांना ४५ दिवसात मोबदला देणे आवश्यक आहे.]

२) ब्रेक इव्हन पॉइंट

करोनामुळे लादल्या गेलेल्या टाळेबंदी आणि त्यानंतर येणाऱ्या सार्वजनिक जीवनातील बदलांच्या आपल्या उद्योगावरील परिमाणांचा आपण अंदाज घेतला असेलच! त्यानुसार टाळेबंदीमध्ये आपला व्यवसाय किती क्षमतेवर चालत होता? ताळेबंदीनंतर तो पूर्वस्थितीत येण्यासाठी किती महिने / आठवडे लागतील या प्रश्नांचा आडाखा बांधून त्याप्रमाणे पावले उचलली आहेत का? उदा. (अ) सर्व ऐच्छिक खर्च पुढे ढकलणे किंवा रद्द करणे (ब) अत्यावश्यक खर्च कमी करून आपल्या उद्योगांचा ब्रेक इव्हन पॉइंट कमी करणे (क) उद्योगांची पुनर्रचना करणे इत्यादी. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या न्यायाने ब्रेक इव्हन पॉइंट कमी करून उद्योगाला पूर्वपदावर आणण्यासाठीच्या सर्व आर्थिक निर्णयांबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे.

३) उद्योगाची तग धरण्याची क्षमता वाढवणे

वरील मुद्दय़ांचा विचार करून आपला खर्च कमी करून आणि येणाऱ्या पैशांचा ओघ निर्माण करून किंवा पैसे उभे करून आपण जास्तीत जास्त महिने तग धरू शकण्यासाठीचे निर्णय घ्यावे लागतील. ते घेऊन त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. तग धरू शकण्यासाठी खर्च कमी करणे आणि आर्थिक तरलता वाढवणे अशा निर्णयामुळे उद्योजकाला आत्मविश्वास वाढवणे / टिकवणे सोपे जाईल. एखाद्या उद्योगाला तग धरणे कठीण जात असेल तर योग्य वेळेत त्यातून सुटका करून घेणे आवश्यक आहे. ही सुटका उद्योग विकून / हस्तांतरित करून वा बंद करूनही करावी लागू शकते.

४) खेळत्या भांडवलाचे महत्त्व

आपल्या उद्योगात नफा होणार का नुकसान आणि ते किती होणार यामध्ये आपल्या खेळत्या भांडवला (वर्किंग कॅपिटल) चा हात या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे खालील पाच गोष्टींची किंमत आणि लागणारा वेळ कमी करणे हे प्रत्येक उद्योजकाचे कर्तव्य आहे. (अ) कच्चा माल /कामगार (ब) वर्क इन प्रोग्रेस — प्रगतिपथावरील माल (क) तयार माल (ड) आपल्याला असलेले येणे (इ) आपले असलेले देणे. या पाच बाबींवर जास्तीत — जास्त नाविन्यपूर्ण विचारांनी काम करून नियंत्रण मिळवणे फायदेशीर ठरेल.ोर्यालयावर होणारा खर्च किंवा कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च सर्वच उद्योगांना दिसतो, परंतु वेळेत भांडवल अधिक उत्पादनक्षम करण्याकडे रोख थोडा कमी असतो तो वाढवणे आवश्यक आहे.

५) रुपये ३,००,००० कोटी आणि रुपये ५०,००० कोटीच्या योजना

आलेल्या आपत्तीत वाहून न जाता त्या आपत्तीचा फायदा उचलून प्रचंड भरारी येण्यासाठी आपल्या वस्तू आणि सेवांचा स्तर उच्च ठेवून जर दर कमी ठेवू शकलो तर आपला उद्योग उंच भरारी घेऊ  शकतो. सरकारने दिलेल्या योजनेनुसार आपल्या उद्योगाला २०% अधिक कर्ज मिळू शकते, तेही कुठल्याही अतिरिक्त तारणाशिवाय. परंतू ही योजना ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मुळात आपल्या उद्योगासाठी वाढीव कर्ज उत्पन्नवाढीसाठी घेतलं जातंय का याची खबरदारी आवश्यकच! तसेच भागभांडवल उभारणीसाठी आवश्यक आकर्षकता आपल्या व्यवसायात निर्माण करणे आणि त्याबद्दलचा विश्वास गुंतवणूकदारांना देणे यावर खूप परिश्रम घेणे आवश्यक आहे.

६) पुनर्निर्माण आणि पुनर्बांधणी

यापूर्वीच्या काही लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पुनर्निर्माण आणि / किंवा पुनर्बांधणी जवळजवळ प्रत्येक उद्योगाला कमी अधिक प्रमाणात करावीच लागणार आहे आणि त्या सर्व दृष्टीने तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ न वेळच्या वेळी निर्णय घेणे हे प्रत्येक उद्योजकाचे दायित्व आहे. पुढील काळासाठी शुभेच्छा!

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in