रोजगारातील संथ वाढ चिंताजनक

नवी दिल्ली : संथ रोजगारवाढ आणि घसरलेली ग्राहक मागणीबाबत चिंता व्यक्त करतानाच आशियाइ विकास बँक अर्थात ‘एडीबी’ने भारताचा चालू आर्थिक वर्षांसाठीचा विकास दर अंदाज ५.१ टक्क्यांवर आणून ठेवला आहे.

देशाला ६.५ टक्के विकास दराचा पल्ला पुढील वित्त वर्षांत, २०२०-२१ मध्ये गाठता येईल, असेही आशियाइ विकास बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र त्यासाठी सरकारची आर्थिक धोरणे पूरक असायला हवीत, असेही सुचविले आहे.

दक्षिण आशियात महत्त्वाचा देश असलेल्या भारतात २०१८ मध्ये गैरबँकिंग वित्त कंपन्यांमधील जोखीम दुर्लक्षित होऊन एकूणच वित्तीय क्षेत्रात पत पुरवठय़ात आक्रसता आली, असे निरिक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

याचबरोबर भारतातील, विशेषत: ग्रामीण भागातील दुष्काळामुळे ग्राहकांकडून असलेली मागणी रोडावून त्याचे रूपांतर संथ रोजगारवाढीमध्ये झाल्याचेही आशियाई विकास बँकेच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आशियाइ विकास बँकेने यापूर्वी, सप्टेंबर २०१९ मध्येही भारताचा चालू वर्षांसाठीचा विकास दर अंदाज आधीच्या ७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत आणून ठेवला होता. आता यापूर्वीचा २०२०-२१ साठीचा विकास दर अंदाजही ७.२ टक्क्यांवरून थेट ६.५ टक्के करण्यात आला आहे.

गेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात रिझव्‍‌र्ह बँकेनेही भारताचा मार्च २०२० अखेपर्यंतचा विकास दर अंदाज आधीच्या ६.१ टक्क्यांवरून तब्बल ५ टक्क्यांपर्यंत आणून ठेवला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताचा २०१९ अखेरचा विकास दर अंदाज ७ टक्क्यांवरून ६.१ टक्के केला होता. जागतिक बँकेचा याबाबतचा अंदाज ६ टक्के आहे.

एकूण दक्षिण आशियाचा २०१९ चा आर्थिक विकास दर ५.१ टक्के असेल, असे आशियाइ विकास बँकेने आशियाई विकास आढाव्यात नमूद केले आहे. त्याचा अंदाजदेखील यापूर्वी ६.२ टक्के होता. तसेच या भारताचा समावेश असलेल्या या भूभागातील सर्व देशांचा मिळून २०२० मध्ये विकास दर आधीच्या ६.७ टक्क्यांऐवजी ६.१ टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.