मुंबई : उद्योग संघटना ‘असोचॅम’द्वारे दिला जाणारा ‘वूमन इन सायबर’ हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांना प्रदान करण्यात आला. सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बुधवारी सायंकाळी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव ज्योती अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्वाती पांडे यांनी सहकारी बँकांवर वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांना रोखणारी सायबर सिक्युरिटी ऑपरेटिंग सेंटर अर्थात सी सॉक या प्रभावी यंत्रणेच्या कार्यान्वयनाची मोलाची कामगिरी बजावली आहे.