नवी दिल्ली : सलग दहाव्या महिन्यात घसरण नोंदविणारा वाहन विक्रीचा वेग गेल्या दोन दशकाच्या सुमार स्तरावर येऊन ठेपला आहे. ऑगस्टमध्ये देशातील सर्वच गटातील वाहनांची विक्री १८.२१ लाखांवर स्थिरावली असून वार्षिक तुलनेत त्यात थेट २३.५५ टक्के आपटी नोंदली गेली आहे.

वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने सोमवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वीच्या २३.८२ लाखांवरून वाहन विक्री आता १८ लाखांवर आली आहे. या क्षेत्राने जुलैमध्ये १९ वर्षांची किमान विक्री नोंदविली होती.

‘सिआम’मार्फत देशातील एकूण वाहन विक्रीचे आकडे स्पष्ट केले जात असल्यापासून, १९९७-९८ पासून या क्षेत्राने आतापर्यंतची सर्वात कमी विक्री यंदा अनुभवली आहे. यंदा देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री तर ३१.५७ टक्क्य़ांनी कमी होत १.९६ लाखांवर येऊन ठेपली आहे.

दरम्यान, खरेदीदारांकडून मागणी नसल्याने चालू महिन्यातील उर्वरित कालावधीत उत्पादन निर्मिती बंद ठेवावी लागत असल्याचे अशोक लेलँडने सोमवारी स्पष्ट केले.

रोजगार वाचविण्यासाठी तरी उपाय करा – किरण मुजुमदार-शॉ

कमी ग्राहक मागणीचा सामना करावे लागत असलेल्या वाहन क्षेत्रातील रोजगार वाचविण्यासाठी तरी सरकारने उपाय करावेत, असे आघाडीच्या उद्योजिका व बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुजुमदार-शॉ यांनी म्हटले आहे. देशातील निर्मिती क्षेत्रातील निम्मा हिस्सा वाहन क्षेत्रातील रोजगार राखत असून या क्षेत्राने गेल्या दोन दशकातील सुमार विक्रीचा सामना केला आहे. यापूर्वी महिंद्र अँड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनीही उपाययोजनांबाबत ट्विट करत सरकारचे लक्ष वेधले होते.