‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे स्पष्टीकरण

पुणे : राज्याच्या काही भागांत शेतकऱ्यांना दिले जाणारे शेतीविषयक कर्जवाटप थांबविण्याच्या संदर्भात कोणतेही बंधन घातलेले नाही. उलट बँकेच्या निवडक आठ क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना शेती कर्ज मंजुरी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निर्देश दिले गेले आहेत, असे स्पष्टीकरण बँक ऑफ महाराष्ट्रकडून बुधवारी करण्यात आले.

बँकेच्या कृषी कर्जविषयक सुधारित मार्गदर्शक तत्त्वांसंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात हा खुलासा करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक कर्जाचे रूपांतरण तसेच दीर्घ मुदत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम तसेच सध्याच्या पीक कर्जाचे नूतनीकरण शाखा पातळीवरच होत आहे. फक्त नव्याने आणि पहिल्यांदाच सादर झालेले कर्जप्रस्ताव संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले जात असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सत्वर आणि वेळेवर कर्जपुरवठा व्हावा यासाठी वरील कार्यकृती अमलात आणली गेली आहे. क्षेत्रीय कार्यालयातील समर्पित कृषी कर्ज प्रक्रिया विभागात पुरेशा अधिकारी राहतील आणि त्यांच्याद्वारे त्वरित निर्णय घेऊन ही कार्यकृती सशक्त बनेल, अशीही काळजी घेतली गेली आहे. मे महिन्यापासून पुढे ‘शेतकरी मेळावे’ आयोजित करून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुलभ आणि वेळेवर केला जाईल, अशी ग्वाही बँकेने दिली आहे.