आयफोन आणि अंड्रॉईड स्मार्टफोनने सर्वच देशांतील बाजारात जोरदार मुसंडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या रिसर्च इन मोशनने आपला बहुप्रतिक्षित ब्लॅकबेरी १० बुधवारी लॉंच केला.
या नव्या स्मार्टफोनवर कंपनीचे भवितव्य अवलंबून आहे. या स्मार्टफोनच्या लॉंचिंगवेळी सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या भारतीय वंशाच्या विवेक भारद्वाज यांच्यावर. २९ वर्षांचे विवेक भारद्वाज हे रिसर्च इन मोशनच्या सॉफ्टवेअर विभागाचे प्रमुख आहेत. ब्लॅकबेरी १०च्या सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
नव्या स्मार्टफोनच्या लॉंचिंगवेळी भारद्वाज यांनी ट्विट केले होते की, “सर्व लक्ष केवळ अद्ययावत सॉफ्टवेअर निर्मितीवर केंद्रित केलंय,” याच नव्या सॉफ्टवेअरवर आता ब्लॅकबेरीच्या आशा जिवंत आहेत.
आयफोन आणि अंड्रॉईडमुळे ब्लॅकबेरी स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली. एकट्या अमेरिकेमध्ये ब्लॅकबेरी स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये २००८ पासून घट होते आहे. गेल्या वर्षीही या स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये दोन टक्क्यांनी घट झाली. ब्लॅकबेरी १०चे लॉंचिंग याआधीही अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले होते. असोसिएटड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, यामुळे कंपनीच्या भागधारकांचे ७० बिलियन डॉलरचे नुकसान झाले.
भारद्वाज डिसेंबर २००६मध्ये रिसर्च इन मोशन कंपनीत रुजू झाले. मात्र, गेल्या १८ महिन्यांपासून त्यांच्याकडे सॉफ्टवेअर विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली. भारद्वाज स्वतःला कॅनडामध्ये स्थायिक झालेले ब्रिटिश नागरिक समजतात. त्यांचे आई-वडील दोघेही भारतीय आहेत. त्यांच्या वडिलांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यानंतर ७०च्या दशकात ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या आईचा जन्मही भारतात झाला आणि पुढे त्या केनियामध्ये वाढल्या.
कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हा भारद्वाज यांचा आवडता विषय. इंग्लंडमध्येच इन्फॉर्मेशन सिस्टिम आणि डिझाईनमध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतले. २००६पर्यंत ते सिमेन्स मोबाईलमध्ये काम करीत होते. त्यानंतर ते रिसर्च इन मोशनमध्ये रुजू झाले.