अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख बेन बर्नान्के यांच्या विधानांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ भांडवली बाजारांनी घेतला असून केवळ भारतीयच नव्हे तर सर्व विकसनशील देशांचे चलन रोडावले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.
महिन्याभरापूर्वीही गुंतवणूकदारांनी बर्नान्केच्या वक्तव्यांवर अशीच अनाठायी चिंता व्यक्त केली होती, याची चिदम्बरम यांनी पुन्हा आठवण करून दिली.
रुपयातील गुरुवारच्या ऐतिहासिक घसरणीबद्दल बोलताना ते म्हणाले, गुंतवणूकदारांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही. विदेशी चलन व्यवहारात जे झाले त्याबाबत निश्चिंतता अजिबात नाही. रुपया डॉलरच्या तुलनेत सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक  अत्यावश्यक सर्व ती पावले लवकरच उचलेल.
दरम्यान, संरक्षणासह विविध क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीबाबतच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेईल, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. संरक्षण क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंत, मल्टिब्रॅण्ड रिटेलमध्ये ७४ टक्क्क्यांपर्यंत तर औषधनिर्माण, ऊर्जा, राष्ट्रीयकृत बँका, प्रसारमाध्यमे यांच्यात ४९ टक्क्यांपर्यतच्या थेट विदेशी गुंतवणुकीची शिफारस केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.