ज्यांच्याविषयी आपणांस आदर, प्रेम वाटते ते त्यांच्यासमोर व्यक्त करण्याचा १४ फेब्रुवारी हा दिवस. भांडवली बाजारात जिच्यावर आपण भरभरून प्रेम करतो त्या ‘निफ्टी’ने आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करत व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून आपल्या स्वभावाविषयीचं मनोगत वाचकांसमोर व्यक्त केलं..
निफ्टी म्हणाली, प्रेमातील प्रणय हा नेहमीच अनिश्चिततेवर आधारलेला असतो व हीच अनिश्चितता, चंचलपणा माझ्या स्वभावाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. माझ्या चंचलपणामुळे वाचक नेहमीच गोंधळात पडून म्हणतात.. ‘‘अरे आता तर इथे होती गेली कुठे?’’ आताचेच पाहा ना! अल्पावधीत गिरकी घेऊन ७,९०० ते ८८०० पर्यंत मजल!
निफ्टी म्हणाली.. दुर्दैवाने गुंतवणूकदारांचे प्रेम, स्तुती मला पचवता/ टिकवता येत नाही. सगळी दुनिया माझ्यावर भरभरून प्रेम करायला लागली की, मी सर्वाची निराशा करते.. नेमका उच्चांक मारून घसरणीला सुरुवात होते. म्हणतात ना, ऑन युफोरिया मार्केट फॉर्म टॉप!
गुंतवणूकदार आणि निफ्टी यांचा स्नेह वृिद्धगत होण्यासाठी निफ्टीने दिलेला सल्ला
गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतविता त्या रकमेचे २५ टक्के याप्रमाणे चार भाग करून घ्यावी व तेजीचा कल असलेल्या समभागात प्रत्येक घसरणीला २५ टक्के समभाग खरेदी करावेत. याचा सर्वात मोठा फायदा हा की, पूर्वी एका फटक्यात सर्व रक्कम गुंतवली व नंतर समभागाच्या किमती घसरल्या की वाचक हवालदिल व्हायचा व नंतर समभाग कधी वाढणार याची वाट पाहायचा (व नंतर समभागाची किंमत घसरली की पशाची वाट लागायची). आता फक्त २५ टक्के रक्कम गुंतवल्यावर हा समभाग आणखी खाली कधी येणार याची वाचक आतुरतेने वाट पाहतो. पूर्वी व आता वाटच पाहावी लागणार पण दोघांमधला वैचारिक, आर्थिक व मानसिक फरक समजून घ्या व आपल्या गुंतवणुकीची वाट निवडा (व्हॅलेंटाइन डे ला सुरू झालेला निफ्टी – वाचक संवाद पुढेही चालू राहील.)

येत्या आठवडय़ातील निर्देशांकाची वाटचाल :
शुक्रवारचा निर्देशांकांचा स्तर : सेन्सेक्स २८,३३४.२५/ निफ्टी (कॅश) ८,७९३.५५
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकावर अनुक्रमे २८,१५० ते २८,५०० आणि ८,७०० ते ८,८५०चा टप्पा (बॅण्ड) निर्माण झाला आहे.
निर्देशांकाचा २८,५००/ ८८५०चा वरचा टप्पा अनुक्रमे २९,००० ते २९,२०० आणि ८,९५० ते ९,००० असा असेल.
निर्देशांकांनी जर २८,१५०/ ८,७००चा खालचा नकारात्मक छेद दिल्यास, खालचे पहिले उद्दिष्ट २७,८००-२७,७५० / ८,६५०-८,६०० तर दुसरे उद्दिष्ट २७,७०० ते २७,३०० व ८,४०० ते ८,५०० असेल.