आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने प्रस्तावित भागविक्री (आयपीओ) द्वारे ३० टक्के भागभांडवल सार्वजनिकरीत्या विकून सौम्य करण्याचे ठरविले आहे. ही भागविक्री चालू आर्थिक वर्षांतच राबविली जाणे अपेक्षित असून, येत्या जुलैमध्ये तसा प्रस्ताव ‘सेबी’कडे दाखल केला जाईल. आपल्या प्रस्तावित भागविक्रीसाठी बीएसईने एडेल्वाइज फायनान्शियल सव्र्हिसेस या कंपनीची मुख्य र्मचट बँकर म्हणून नियुक्ती केली आहे. तर विधि सल्लागार म्हणून एझेडबी अँड पार्टनर्स आणि निशित देसाई असोसिएट्स यांना काम सोपविण्यात आले आहे. भागविक्रीच्या या प्रस्तावाला २४ जूनला नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी मिळविली जाणार आहे. या सभेसाठी दिलेल्या नोटिशीत भागविक्रीचे आकारमान एकूण भागभांडवलाच्या ३० टक्क्यांहून अधिक नसेल, असे सूचित करण्यात आले आहे. बीएसईच्या विद्यमान कोणत्या भागधारकांकडून किती टक्के हिस्सा सौम्य केला जाईल, हे ठरविण्यासाठी आणि या प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी त्रयस्थ सल्लागारांची एक समितीही बीएसईने नियुक्त केली आहे. सध्याच्या घडीला मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) हे देशातील शेअर बाजारात सूचिबद्ध झालेला एकमेव बाजारमंच असून, प्रस्तावित भागविक्रीतून बीएसई या पंक्तीतील दुसरा बाजारमंच असेल. आपला प्रतिस्पर्धी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईवर सूचिबद्धतेचा पर्यायही बीएसईने खुला ठेवला असल्याचे सूत्रांकडून समजते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2016 7:43 am