योजनाबद्ध विकास, मुंबई-नाशिक-पुणे या त्रिकोणाचा सुवर्णमध्य आणि भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ अशी ख्याती असलेल्या बदलापूर-अंबरनाथ या जुळ्या शहरांना निवासासाठी अलीकडे मुंबई-ठाणे परिसरात आकाशाला भिडलेल्या जागांच्या किमती पाहता सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. किंबहुना आलिशान जीवनशैलीसह वाजवी किमतीत घरे मुंबई परिसरात केवळ याच जुळ्या शहरातच उपलब्ध आहेत आणि याचा प्रत्यय येथे सुरू झालेल्या ‘पॅनमार्क प्रॉपर्टी प्रदर्शना’ने दिला आहे. या प्रदर्शनाचे आयोजक समीर वत्तुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३० बांधकाम विकासक सामील असलेल्या या प्रदर्शनात बदलापूर व अंबरनाथमधील ७५ पेक्षा अधिक प्रकल्प पाहायला मिळतील. इतक्या मोठय़ा संख्येने आकर्षक किमतीतील घरांबद्दल माहिती एकाच छताखाली उपलब्ध करणारे हे प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू झाले असून, ते रविवार ११ जानेवारी २०१४ पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सर्वासाठी विनामूल्य खुले असेल. अंबरनाथ (पूर्व) येथे चिखलोलीस्थित जीबीके लॉन्स येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
युनियन बँकेकडून मुदत ठेवींवर व्याजदर कपात
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने येत्या सोमवार १२ जानेवारीपासून आपल्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एक वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजाचे दर ०.१५ टक्के ते ०.३० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या एक वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटले आहेत.