बर्गर किंग इंडियाचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी एक ब्लॉकबस्टर ठरला आहो. बुधवारी पुन्हा एका बर्गर किंगच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांचं अपर सर्किट लावण्यात आलं. २० टक्क्यांच्या तेजीसह बर्गर किंगच्या शेअर्सचा दर १९९ रूपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी मंगळवारीदेखील बर्गर किंगच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लावण्यात आलं होतं. यावेळी बर्गर किंगचा शेअर १६६ रूपयांवर पोहोचला होता. ज्या गुंतवणुकदारांनी बर्गर किंगच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांना तीन दिवसांमध्ये तिप्पट नफा झाला आहे. सोमवारी बर्गर किंगची शेअर बाजारात ९२ टक्के प्रिमिअमसह जोरदार एंट्री झाली होती.

गेल्या तीन दिवसांमध्ये बर्गर किंगच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा नफा झाला आहे. सोमवारी जेव्हा बर्गर किंगचा आयपीओ लिस्ट झाला त्यावेळी कंपनीचं मार्केट कॅप ४ हजार ४६० कोटी रूपये होतं. बर्गर किंगच्या शेअरची इश्यू प्राईज ६० रूपये इतकी होती. परंतु ती ५५ रूपयांनी वाढून शेअर ११५ रूपयांवर लिस्ट झाला. लिस्टींगच्याच वेळी गुतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले. तर दुसरीकडे लिस्टींगच्याच दिवशी शेअरची इश्यू प्राईज १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढून १३८ रूपयांवर बंद झाली.

बुधवारी कामकाजाच्या वेळी बर्गर किंगचा शेअर १९९ रूपयांवर पोहोचला. बर्गर किंगच्या शेअर्सची इश्यू प्राईज ६० रूपये होती. अशात गुंतवणुकदारांना इश्यू प्राईजपासून २३२ टक्के नफा अद्याप मिळाला आहे, बर्गर किंगच्या आयपीओची लॉट साईज २५० शेअर्सची होती. गुंतवणुकदारांना किमान १५ हजार रूपये यात गुंतवावे लागणार होते. बर्गर किंगनं २०१४ मध्ये भारतात आपलं पहिलं रेस्टराँ सुरू केलं होतं. आज देशभरातील ५७ शहरांमध्ये बर्गर किंगची २६८ स्टोअर्स आहेत. त्यापैकी ८ फ्रेन्चायझी विमानतळांवर आहेत. आयपीओद्वारे मिळालेल्या या फंडचा वापर कंपनी विस्तारासाठी आणि कर्जाची रक्कम फेडण्यासाठी करणार आहे.