करोना साथीच्या प्रसाराने पुन्हा डोके वर काढल्याने टाळेबंदीसारखे अंशत: निर्बंधमात्रेमुळे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सोमवारी पुन्हा धास्ती निर्माण झाली. याच सावटाखाली सप्ताहारंभीचे समभाग विक्रीचे तुलनेत अधिकचे व्यवहार झाल्याने प्रमुख निर्देशांकांने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी सत्रआपटी अनुभवली.

एकाच व्यवहारातील २ टक्क्यांच्या निर्देशांक घसरणीने सेन्सेक्ससह निफ्टी त्याच्या अनोख्या टप्प्यापासून फारकत घेतली. मुंबई निर्देशांक आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात थेट १,१४५.४४ अंश घसरणीने ४९,७४४.३२ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३०६.०५ अंश घसरणीनंतर १४,६७५.७० पर्यंत स्थिरावला.

जागतिक भांडवली बाजारातील घसरण साथीपेक्षा देशातील करोना साथीच्या वाढत्या प्रसाराने गुंतवणूकदार चिंताग्रस्त बनले. त्यांच्या सकाळच्या सत्रापासूनच्या समभाग विक्रीच्या माऱ्याने एकटय़ा मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूक सत्रात ३.७२ लाख कोटी रुपयांनी रोडावली. गेल्या आठवडय़ातही निर्देशांक सलग चार व्यवहारांत घसरले होते.

सोमवारच्या घसरणीने सेन्सेक्सने त्याचा ५० हजारांचा स्तरही सोडला, तर निफ्टी १५ हजारांपासून आणखी दूर गेला. मुंबई निर्देशांकात गेल्या पाच दिवसांत मिळून झालेली आपटी २,४०९.८१ पर्यंतची आहे, तर निफ्टी या दरम्यान ६३९ अंशांनी खाली आला आहे.

डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे वाढते मूल्य तसेच रोख्यांवरील व्याज वाढूनही बाजारात तेजी निर्माण करू शकले नाही. उलट नव्या आठवडय़ातील पहिल्या सत्रारंभापासूनच सुरू असलेली निर्देशांक घसरण सोमवारचे व्यवहार संपुष्टात येईपर्यंत विस्तारत गेली. दोन्ही निर्देशांक सत्रअखेर त्यांचा व्यवहारतळही नोंदविते झाले.

सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज् सर्वाधिक, ४.७७ टक्क्यांसह घसरला, तर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टेक महिंद्र, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस आदींचेही मूल्य रोडावले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी ओएनजीसी, एचडीएफसी बँक व कोटक महिंद्र बँक हे तीनच समभाग एक टक्क्यापर्यंतच्या वाढीसह तेजीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, वाहन, भांडवली वस्तू जवळपास ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर पोलाद निर्देशांक वाढला.

एकाच व्यवहारात ३.७२ लाख कोटींचे अवमूल्यन

सोमवारच्या एकाच व्यवहारातील २ टक्क्यांहून अधिकच्या निर्देशांकाची नोंद होणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य थेट ३.७२ लाख कोटी रुपयांनी रोडावून २००.२६ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. गेल्या सप्ताहाखेर ते २०३.९८ लाख कोटी रुपये होते.

पाच सत्रात ५ लाख कोटींचे नुकसान

गेल्या पाच सत्रातील सेन्सेक्समधील घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे या दरम्यान ५ लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले आहे. गेल्या मंगळवारपासूनच्या घसरणीत मुंबई निर्देशांक एकूण २,४०९.८१ अंशांनी खाली आला आहे. गेल्या आठवडय़ात सेन्सेक्स ५२,१५४.१३ या वरच्या टप्प्याला होता. तो आता ५० हजाराच्याही खाली आला आहे. गेल्या आठवडय़ात वरच्या टप्प्यावरील मूल्यामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करून नफावसुलीचे धोरण अवलंबिले होते.

निर्देशांक विक्रमापासून ५ टक्के दूर

प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या सर्वोच्च टप्प्यांपासून तब्बल ५ टक्क्य़ांनी दूर आहेत. पैकी चालू सप्ताहारंभी व गेल्या सप्ताहाखेर त्यात लक्षणीय घसरण नोंदली गेली. तत्पूर्वी प्रमुख निर्देशांक वरच्या टप्प्यावर होते.