जागतिक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्यांना भारताची विस्तारणारी बाजारपेठ खुणावू लागली असून, जागतिक स्तरावर बाजारपेठेवर वरचष्मा गाजविण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या कॅरियर आणि मायडिया या दोन बडय़ा ब्रॅण्ड्सनी भारतातही एकजूट करून ‘कॅरियर-मायडिया इंडिया प्रा. लि.’ नावाने संयुक्त कंपनीमार्फत आपली विस्तृत उत्पादन-शृंखला दाखल केली आहे. आगामी वर्षभरात या संयुक्त कंपनीकडून एसी बाजारपेठेत पहिल्या तीनात स्थान मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
चीनमध्ये मुख्यालय असलेल्या आणि जगभरात १९० देशांत विस्तार फैलावलेल्या ‘मायडिया’ने कॅरियरसह केलेली ही जगभरातील सहाव्या बाजारपेठेतील भागीदारी आहे. मायडियाच्या ६० टक्के तर कॅरियरच्या ४० टक्के हिस्सेदारीतून बनलेल्या ‘कॅरियर-मायडिया इंडिया’ या संयुक्त कंपनीद्वारे निवासी आणि वाणिज्य वापराच्या वातानुकूलन यंत्रांसह, होम अप्लायन्सेस श्रेणीच्या उत्पादनांचे विक्री व वितरणही केले जाणार आहे. प्रारंभी मायक्रोवेव्ह आणि वॉटर डिस्पेन्सर्स अशी उत्पादने सादर केली जातील, असे कॅरियर-मायडिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णन सचदेव यांनी सांगितले. वातानुकूलन यंत्रे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त होम अप्लायन्सेस उत्पादने ही मुख्यत: देशातील व्यापक बाजारपेठेची गरज भागविण्याचे उद्दिष्ट ठेवून सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१२ मध्ये सुरू झालेल्या या भागीदारीतून हरयाणास्थित बवाल येथे वार्षिक १० लाख एसीची निर्मिती करणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा उत्पादन प्रकल्पाची स्थापना  १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून करण्यात आली. आगामी पाच ते सहा वर्षांत भारतात उभय भागीदारांकडून संयुक्तपणे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. परंतु सध्या तरी होम अप्लायसेन्सच्या निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प भारतात सुरू करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे सचदेव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही उत्पादने सध्या चीनमधून आयात करून भारतातील प्रमुख ३० शहरातील १००० हून अधिक विक्रेत्यांकडे  उपलब्ध होतील. या शहरातील जवळपास ७५० विक्रीपश्चात सेवा केंद्रे, जागतिक दर्जाच्या आधुनिक उत्पादनांमधून पसंतीसाठी व्यापक श्रेणी आणि किफायतशीरता अशा ग्राहकांच्या पथ्यावर पडणाऱ्या बाबी या भागीदारीने दिल्या असल्याचे सचदेव यांनी सांगितले.