जगभरात अमेरिका, युरोपासह ५० देशात आपल्या उत्पादनांची विक्री करीत असलेल्या चीनमधील आघाडीच्या मोबाईल फोनचा ब्रॅण्ड ‘कोन्का’ने अखेर भारतीय बाजारपेठेत प्रवेशाची योजना बनविली आहे. गुगल अ‍ॅण्ड्रॉइड कार्यप्रणालीवरील स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या ‘कोन्का’चा भारतातील तरुणवर्ग हा प्रमुख ग्राहक असेल.
कोन्काने भारतात वितरण व विक्रीसाठी मॅक मोबिलिटी प्रा. लि. या कंपनीची भागीदार म्हणून निवड मंगळवारी जाहीर केली. देशात सध्याच्या घडीला विकल्या जाणाऱ्या एकूण मोबाईल हँडसेट्सपैकी स्मार्टफोन्सचा वाटा १० टक्के असून, त्यात वार्षिक १०० टक्के दराने प्रगती दिसून येत आहे. या क्षेत्रातील नोकिया, सॅमसंग, एचटीसीच्या स्पर्धेत आता ‘कोन्का’चा कस हा गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण कार्यवैशिष्टय़े या आधारेच लागेल, असे कोन्का टेलीकॉमचे अध्यक्ष ली होन्गताओ यांनी सांगितले. तब्बल ३०० लाख डॉलरच्या गुंतवणुकीसह ‘कोन्का’ने विपणन आणि प्रचार-प्रसाराची योजना बनविली असल्याचे त्यांनी सांगितले.