भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांचे बार कोडिंगसह सेकंडरी पँकिंग सक्तीचे केले जाणे हे अशी तांत्रिक सेवा प्रदान करणाऱ्या ‘एसीजी इन्स्पेक्शन’सारख्या कंपन्यांना व्यवसायवृद्धीचा लाभ मिळवून देणारी ठरेल. सध्याच्या घडीला अत्याधुनिक दृष्टी निरीक्षण प्रणालीची एसीजी इन्स्पेक्शन ही अग्रेसर कंपनी आहे.
औषधांच्या निर्यातदार कंपन्यांना आपल्या निर्यात होणाऱ्या मालाचे इच्छित स्थळी सुरक्षित वितरण होईपर्यंत माग घेता यावा, जेणेकरून बनावट व औषधांची नक्कल होण्याला प्रतिबंध घातला जाईल, यासाठी निर्यात मालाच्या पॅकिंगचे बार कोडिंग सक्तीचे करणारा अध्यादेश लागू झाला आहे. जानेवारी २०१२ पासून अंमलात येणारे हे नियमन वर्षभराच्या विलंबाने अंमलात आल्याने भारतीय औषधी उद्योगाची प्रतिष्ठाही जपली जाणार आहे. परिणामी एसीजी इन्स्पेक्शनने विकसित केलेल्या ‘व्हेरिफ-आय’ या मागोवा प्रणालीला औषधी कंपन्यांकडून मागणी मिळणे अपेक्षित आहे, असे एसीजी इन्स्पेक्शनचे संचालक (व्यवसाय विकास) हरपाल सिंग यांनी सांगितले. पुरवठा-शृंखला निर्धोक बनवून, औषधांच्या बनावट प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी आणि प्रसंगी औषधी कंपन्यांना महसुली नुकसानापासून वाचविण्याच्या दृष्टीने ‘व्हेरिफ-आय’ हा एक सर्वोत्तम उपाय असल्याचे सिंग यांनी सांगितले.