विप्रो समूहांतर्गत समावेश असलेल्या ‘कन्झ्युमर केअर’ विभागाने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीने उत्कृष्ट व्यवसायवाढीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले असून नव्या २०१३-१४ ची पहिली अर्धवार्षिक अर्थव्यवस्था रुळावर येण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डला मिळालेल्या प्रतिसादापोटी गेल्या तिमाहीत एक हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे शिखर सर करणाऱ्या विप्रोच्या या विभागाचे उपाध्यक्ष पराग कुलकर्णी यांनी हे क्षेत्रच यंदा ५ ते ६ टक्क्यांनी वेग पकडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विप्रोच्या या विभागात यार्डले, संतूर, उन्झा ही उत्पादने आघाडीवर राहिली आहेत. त्यात एन्चान्टर, रोमॅनो आणि साफी यांचीही भर पडली आहे. या विभागांतर्गत कंपनीचा एलईडी लाईटिंग आणि तयार ऑफिस फर्निचर उद्योगही वाढला आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतात १४.२ टक्के हिश्शासह या भागात क्रमांक एकवर असणाऱ्या संतूरने गेल्या तिमाहीत एकूण बाजारपेठेत ८.४ टक्के हिस्सा काबीज केला आहे. देशपातळीवर हा साबण क्रमांक तीनचा साबण ठरला आहे.
कुलकर्णी यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, विप्रो समूहाच्या ‘कन्झ्युमर केअर’ विभागाने जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीत १५ टक्के वाढीसह १,०४४ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे, तर २०१२-१३ या एकूण आर्थिक वर्षांतील वाढ २२ टक्के असून एकूण महसूल ४,०५९ कोटी रुपये झाला आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या विदेशी ब्रॅण्डचे प्रमाण व्यवसायाच्या ४८ टक्के असून एलईडी लाईटिंग आणि ऑफिस फर्निचर निर्मितीत सादर केलेल्या नव्या उत्पादनांमुळे यंदा हे यश गाठता आले आहे, असेही ते म्हणाले.