मुंबई : प्राणघातक करोना विषाणूच्या साथीचे जागतिक तसेच देशांतर्गत परिणामांवर भारतीय रिझव्‍‌र्ह बँक बारकाईने नजर ठेवून असून, वित्तीय बाजारपेठेचे कामकाज सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी आवश्यक त्या कारवाईसह पावले टाकली जातील, अशी ग्वाहीही तिने मंगळवारी दिली.

जागतिक स्तरावर भांडवली बाजारात या आजारसाथीच्या परिणामी प्रचंड अनिश्चितता आणि पडझडीचे वातावरण आहे. करोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या असून, सोने व तत्सम अन्य सुरक्षित पर्यायांकडे गुंतवणूक वळविली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे या परिस्थितीवर रिझव्‍‌र्ह बँकेचे हे निवेदन, अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून याच धर्तीचे निवेदन आल्याच्या दुसऱ्या दिवशी आले आहे.

भारतातील भांडवली बाजारातील पडझडीला बऱ्याच प्रमाणात अंकुश आणता आला आहे. त्यातच रिझव्‍‌र्ह बँकेकडून आलेल्या आश्वासक निवेदनाने बाजार भावनांना चालना मिळाली आणि सलग सात व्यवहारांत सुरू राहिलेल्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारात खरेदीला बहर आलेला दिसला. करोना साथीचे व्यापक परिणाम कमी करण्यासाठी सुसूत्रित धोरणात्मक कृती होऊन आर्थिक क्रियाकलापांना चालना दिली जाईल, अशी भांडवली बाजाराची अपेक्षा आहे.

वित्त बाजारपेठेच कामकाज सुव्यवस्थित चालेल याची खातरजमा करीत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम राहील आणि आर्थिक स्थिरताही जपली जाईल, यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची सदैव तत्परता आहे, असे मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.