करोनाच्या भयछायेतच

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या व अधिक तीव्र स्वरूपाच्या लाटेने एकूण अर्थचक्राची गती मंदावली असली तरी सरलेल्या एप्रिल महिन्यात खासगी गुंतवणुका, तसेच कंपन्यांच्या अधिग्रहण व विलीनीकरणाचे विक्रमी १६१ व्यवहार नोंदविले गेले, जे दशकातील उच्चांकी प्रमाण आहे.

एप्रिल महिन्यांत झालेल्या या व्यवहारांमधील एकूण आर्थिक उलाढाल ही १३ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (साधारण ९६० अब्ज रुपये) घरात जाणारी आहे, असे ग्रँट थॉर्नटर्न या सल्लागार संस्थेचा अहवाल दर्शवितो. यात सर्वाधिक वाटा हा सुमारे ५ अब्ज डॉलरची उलाढाल असणाऱ्या ३० अधिग्रहण व विलीनीकरण व्यवहारांचा आहे.

करोना दुसऱ्या लाटेचा उद्रेक हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला असला तरी, एप्रिलच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत तीव्र स्वरूपात वाढ सुरू झाली होती. त्या महिनाअखेरपर्यंत दैनंदिन चार लाख नवीन बाधित रुग्ण आणि दिवसाला ४,०००च्या घरात मृत्यू अशी आकडेवारी पोहोचली होती. तर तोवर जवळपास २० राज्यांनी, त्यांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अथवा स्थानिक स्तरावरील टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली होती.

ग्रँट थॉर्नटर्नचे भागीदार प्रशांत मेहरा यांनी अहवालावर भाष्य करताना स्पष्ट केले की, सध्याच्या स्थानिक पातळीवर टाळेबंदीसारख्या कडक निर्बंधांमुळे देशातील आर्थिक घडामोडींचे लक्षणीय प्रमाणात नुकसान झाले आहे, असे दिसून येत नाही. अर्थात करोनाची ही दुसरी लाट कुठपर्यंत लांबत जाईल त्यावरून अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीची गतीही लांबत जाण्याची जोखीम निश्चितच दिसून येते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या भांडवली बाजारावर गंभीर नकारात्मक प्रभाव पाडला नसल्याचे मुख्य निर्देशांकाच्या हालचालीवरून स्पष्ट होते.

तथापि, ताबा-विलीनीकरण व्यवहारांचा विक्रमी स्तर हा करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानाच्या वेळेशी जुळून आला आहे. परंतु हीच गोष्ट गेल्या वर्षातील पहिली लाट आणि यंदाची दुसरी लाट यांच्यातील तफावतीला दर्शविणारी आहे. यंदाची परिस्थिती हाताळली जात असताना, अनेक वित्तीय व आर्थिक घडामोडींना प्रोत्साहनाला मुभा राखली गेली आणि त्यातून अनेक निर्माण झालेल्या संधी साधल्या गेल्या, असे निरीक्षणही मेहरा यांनी नोंदविले.

गेल्या वर्षी एप्रिलमधील पहिल्या लाटेत देशव्यापी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर खासगी गुंतवणुका व ताबा-विलीनीकरण व्यवहारांचे प्रमाण यंदाच्या एप्रिलमधील १६१ तुलनेत निम्म्याहून कमी होते, तर आर्थिक उलाढालीचे प्रमाणही जवळपास ५० टक्के होते, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी हे प्रमाण इतके राहण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले.  फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केलेल्या ५.७ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणूक एप्रिल २०२० मध्ये केली होती, त्या महिन्यांतील एकूण आर्थिक व्यवहारात ३० टक्के योगदान हे या एकट्या व्यवहाराचे होते.