मुंबई :करोना साथीच्या उद्रेकाचा भारतातील कापूस निर्यातीवर शून्य परिणाम दिसून येतो आणि ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विद्यमान पणन हंगामात ४२ लाख गाठींच्या निर्यातीची शक्यता ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)’ने व्यक्त केली आहे. सध्या अपेक्षित भाव नसल्याने हिरमोड झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासाजनक बाब आहे.

गेल्या वर्षी भारतातून चीनला फक्त ८ लाख गाठींची निर्यात होऊ शकली होती, तर यंदा फेब्रुवारीपर्यंतची निर्यातीने ६ लाख गाठींचे प्रमाण गाठले आहे. बांगलादेशला फेब्रुवारीपर्यंत १४ लाख गाठी, व्हिएतनाम व इंडोनेशियाला आणखी पाच लाख गाठी तर अन्य बाजारपेठांना २.५० लाख गाठी कापूस निर्यात झाली आहे. हंगामातील उर्वरित सहा महिन्यांत अपेक्षित निर्यातीचे लक्ष्य गाठले जाईल, असे सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.

एमसीएक्सवरील कापसाच्या वायदा सौद्यात डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान दुपटीने वाढ

मुंबई : करोना विषाणूजन्य आजाराच्या जगभरातील फैलावाने व्यापारी आणि उद्योगक्षेत्रात पसरलेल्या घबराटीचा परिणाम म्हणजे एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे हवालदिल, तर दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) या वस्तू बाजारात कापसाच्या वायद्याचे सौदे हे डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत जवळपास दुपटीने वाढले आहेत.

जगात कापूस उत्पादनात चीन अग्रस्थानावर, त्या खालोखाल भारतात व अमेरिकेत कापसाचे उत्पादन घेतले जाते. चीनमधून कापूस उत्पादन व पुरवठय़ात करोना साथीमुळे आलेल्या अडथळ्याच्या परिणामी किमती घसरत गेल्या आहेत. तथापि एमसीएक्सवरील व्यवहार झालेले कापसाचे वायदा सौदे हे ३१ डिसेंबर अखेर १,२८६.५१ कोटी रुपये मूल्याच्या ६.६७ लाख गाठींच्या तुलनेत, २९ फेब्रुवारी २०२० अखेर २,३४४ कोटी रुपये मूल्याच्या १२.२८ लाख गाठी असे दुपटीने वाढले आहेत. जानेवारीमध्ये तर हे सौदे २,६२१.१६ कोटी रुपये मूल्याच्या १३.२७ लाख गाठी इतक्या उलाढालीपर्यंत कडाडले होते.

वायदा सौद्यात वाढीचे मुख्य कारण हे कापसाला चांगला भाव मिळावा या आशेनेच असल्याचे एमसीएक्सच्या पणन विभागाचे प्रमुख ऋषी नाथानी यांनी सांगितले. किंमत-जोखमीचे निराकरण व सुयोग्य भाव मिळविण्यासाठी  वायदा सौद्यांचे महत्त्व व वस्तू बाजाराची उपयुक्तता यातून अधोरेखित झाली आहे.