अमेरिकेचे निर्बंध भारताच्या इराणहून तेल आयातीला बाधा ठरणार नसल्याचा खुलासा

लंडन : आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती तीन टक्क्यांनी उसळी घेऊन, प्रति पिंप ७७ डॉलरच्या पार गेल्याचे बुधवारी आढळून आले. इराणबरोबरचा आण्विक सामंजस्य करार रद्दबातल ठरविण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयाचा हा परिणाम दिसून आला. या तेल उत्पादक देशावर निर्बंध येण्याच्या शक्यतेतून हा तेलाच्या किमतीचा भडका उडालेला दिसून आला. तर भारतीय चलन रुपयाही डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी गडगडला.

जवळपास ८५ टक्के इंधनाची गरज तेल आयातीतून भागविणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा म्हणजे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति पिंप ७७.०७ डॉलरच्या पातळीवर गेल्याचे बुधवारच्या व्यवहारात दिसून आले. लंडनच्या बाजारात त्या आधीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी उसळल्या. त्याचे विपरीत पडसाद भारताच्या चलनबाजारात उमटताना दिसले. बुधवारी आंतरबँक व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २९ पैशांनी ऱ्हास होऊन रुपया ६७.३७ पातळीवर खुला झाला. आणखी काही मूल्य गमावून रुपयाची प्रति डॉलर ६७.४८ पर्यंत घसरंगुडीही दिसून आली. दिवसअखेर १९ पैसे घसरणीसह डॉलरमागे ६७.२७ पातळीवर रुपया स्थिरावला.

दरम्यान, इराणवर आर्थिक निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे तूर्त तरी काही नकारात्मक परिणाम दिसून येणार नाही असे स्पष्ट होत आहे. जोवर युरोपीय देशांकडून अमेरिकेला साथ दिली जात नाही, तोवर भारताच्या इराणमधून होणाऱ्या तेल आयातीला कोणताही बाधा संभवत नाही, असा खुलासा खुद्द भारतातील तेल कंपन्यांनी केला आहे.

भारताकडून युरोपातील बँकांच्या माध्यम म्हणून वापर करून इराणमधून तेल आयात होते आणि त्याचा मोबदलाही युरो चलनातच अदा केला जातो. युरोपीय महासंघाची अमेरिकेकडून प्रस्तावित इराणवरील र्निबधांबाबत नकारार्थी भूमिका दिसून आली आहे आणि त्यामुळे भारताच्या तेल आयातीच्या दृष्टीने धोक्याची कोणतीही बाब दिसून येत नाही, असे स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन संचालक (वित्त) ए. के. शर्मा यांनी केले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्तिश: भेटीत इराणबरोबरच्या करारातून माघार न घेण्याचे आर्जव ट्रम्प यांना केले आहे. फ्रान्ससह, जर्मनी आणि  इंग्लंड यांनीही अमेरिकेच्या एकतर्फी माघारीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. इराणबरोबरच्या या संयुक्त करारात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य राष्ट्र अर्थात चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, अमेरिकेसह जर्मनीचा समावेश असून, युरोपीय महासंघही त्याचा एक घटक आहे.

इराक आणि सौदी अरबनंतर इराण हा भारताला तेलपुरवठा करणारा तिसरा मोठा देश आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांत १८४ लक्ष टन तेल भारताने इराणमधून आयात केले आहे. इराणकडून होणाऱ्या आयातीवर ९० दिवसांची पत तेल कंपन्यांसाठी आकर्षक ठरत आला आहे.

‘सेन्सेक्स’मध्ये मात्र १०३ अंशांची वाढ

मुंबई : सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये बुधवारी शतकी अंश भर पडली. तर निफ्टी १०,७५० नजीक पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या दरांमध्ये तसेच येथील परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम भांडवली बाजारावर तुलनेने कंमी दिसून आला. १०३.०३ अंश वाढीसह सेन्सेक्स ३५,३१९.३५ वर पोहोचला. तर २३.९० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,७४१.७० पर्यंत स्थिरावला. जागतिक बाजारात घसरणीचे चित्र असताना गेल्या दोन व्यवहारांत सेन्सेक्स ३००.९४ अंशांनी वाढला आहे.