मालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव

मुंबई : दिवाळखोर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची (डीएचएफएल) मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अधिग्रहण बोलीत सुधारणा करण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली आहे.

दिवाळखोर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक आहे. प्रशासकीय मंडळाच्या पर्यवेक्षणाखाली लिलाव प्रक्रिया सुरू असून खरेदी इच्छुक कंपन्यांनी बोली सादर केल्या आहेत.

अदानी समूहाने आधी सादर केलेल्या बोलीत सुधारणा करण्यास परवानगी मागितली असून व्यवहारपूर्व तपासणी पूर्ण केली आहे.

समूहाने ३३,००० कोटींचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

कर्जदार कर्जाची परतफेड न करू शकल्याने डीएचएफएलच्या मालमत्तांचा लिलाव होत आहे. सुरुवातीला केवळ डीएचएफएलच्या घाऊक व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास व्यवसायासाठी अदानी समूहाने ३०,००० कोटींची बोली लावली होती. लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यावर समूहाने प्रस्तावात सुधारणा करण्याची तयारी दाखविली.

पिरामल समूहाने डीएचएफएलच्या कर्ज वितरण व्यवसायासाठी २३,५०० कोटींची, ऑक्ट्री कॅपिटल मॅनेजमेन्टने २८,३०० तर चौथा स्पर्धक एससी लोवी यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास व्यवसायासाठी २,३५० कोटींची बोली लावली आहे.