नवी दिल्ली : यंदाच्या सण-समारंभात अधिकतर खरेदीदार तंत्रस्नेही माध्यमाचा उपयोग करून आपले व्यवहार उरकतील, असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. सर्वेक्षणात सहभागींपैकी जवळपास निम्म्या ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून विनिमयाची मनीषा व्यक्त केली आहे.

‘युगोव्ह’ आणि ‘एसीआय वर्ल्डवाइड’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात २९ टक्के ग्राहकांनी बँकांच्या क्रेडिट/डेबीट कार्डद्वारे तर, २७ टक्के ग्राहकांनी रोखीने वस्तू खरेदीकडे आपला कल असेल, असे नमूद केले आहे.

यंदाच्या दिवाळीतील खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी डिजिटल पेमेंट पर्यायात ई-वॉलेट, यूपीआय पेमेंटसारख्या माध्यमांचा वापर करण्याची इच्छा ४२ टक्के ग्राहकांनी व्यक्त केली आहे. यामध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे.

वस्तू खरेदी केल्यानंतर रक्कम भरण्याकरिता यूपीआय, ई-वॉलेटसह एकूणच डिजिटल पेमेंटचे माध्यम निवडणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याचे ‘एसीआय वर्ल्डवाइड’च्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष कौशिक रॉय यांनी सांगितले. यूपीआय मंचावर महिन्याला आर्थिक व्यवहार होण्याची संख्या १०० कोटींच्या वेशीवर असून, बँक एटीएम कार्डद्वारे व्यवहार होण्याच्या प्रमाणात वार्षिक दुहेरी अंकात वाढ होत असल्याचेही रॉय यांनी सांगितले.

डिजिटल पेमेंटद्वारे किमान १,००० रुपयांपर्यंतचा विनिमय करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असेल, असा अंदाज याबाबतच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये यूपीआयद्वारे विक्रमी ९५.५२ कोटी व्यवहार नोंदले गेले आहेत. वार्षिक तुलनेत त्यात १३५ टक्के वाढ झाली आहे.