सलग चार महिने वाढ नोंदविल्यानंतर गेल्या महिन्यात देशातील प्रवासी कार विक्रीत प्रथमच घट राखली गेली. वर्षभरापूर्वीच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये प्रवासी कार विक्री १.०३ टक्क्य़ांनी रोडावली. ऑक्टोबरमधील दसरा, दिवाळी लक्षात घेत या दरम्यान खरेदीदारांनी काहीसे ‘थांबा व पाहा’ धोरण अवलंबिले.
वाहन उत्पादकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’च्या (सिआम) ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०१४ मध्ये देशांतर्गत १,५४,८८२ प्रवासी कार विक्री झाली. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १,५६,४९४ पेक्षा ती कमी आहे.
ऑक्टोबरमधील दसरा, दिवाळीत वाहने खरेदी करू, अशी इच्छा खरेदीदारांनी व्यक्त केल्याचे प्रत्यक्षात यंदाच्या आकडेवारीवरून दिसत आहे, असे निरीक्षण ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे. चार महिन्यांतील तेजीनंतर सप्टेंबरमध्ये झालेली किरकोळ घसरण सणवाराच्या महिन्यात भरून निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मेपासून सातत्याने प्रवासी वाहन विक्रीत वाढ नोंदली जात होती. गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच असे घडले होते. ऑगस्टपर्यंत वाहनांतील विक्री कायम होती. सप्टेंबरमध्ये मात्र वाहन विक्रीबाबत नकारात्मक प्रवास नोंदला गेला.
तुलनेने मोटारसायकल विक्रीने मात्र विक्रीतील झेप नोंदविली आहे. सप्टेंबरमध्ये १०,५६,५०९ मोटारसायकल विकल्या गेल्या. सप्टेंबर २०१३ मध्ये ही संख्या ८,८५,३०९ होती. वार्षिक तुलनेत त्यात १९.३४ टक्के वाढ झाली आहे. त्यात हिरो मोटोकॉर्पची वाढ २९.४१ टक्के, होन्डा मोटारसायकल १८.९५ टक्के राहिली. बजाज ऑटोच्या विक्रीत मात्र किरकोळ, १.५१ टक्के घट झाली होती. दुचाकीमध्ये स्कूटर क्षेत्राची वाढ ३७.९९ टक्क्य़ांनी उंचावली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये ४,३८,४७० स्कूटर विकल्या गेल्या. एकूण दुचाकी विक्री गेल्या महिन्यात २३.८१ टक्के झाली. वाणिज्यिक वाहनेदेखील ८.५९ टक्क्य़ांनी वधारली. तब्बल १६ महिन्यांनंतर हे क्षेत्र सकारात्मक प्रवास नोंदवते झाले. गेल्या महिन्यात एकूण वाहन विक्रीदेखील २०.४४ टक्क्य़ांनी वाढली आहे.