अमेरिका आणि भारताच्या उद्योगक्षेत्रांनी समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे कळकळीचे आर्जव करून, परस्परातील उद्योजकीय शत्रुत्वाला राजकीय आखाडय़ावर स्थान दिले जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले.     अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेकडून येथे आयोजित ३८ व्या वार्षिक शिखर परिषदेचे बीजभाषण त्यांनी गुरुवारी सादर केले.
भारताने अनुसरलेल्या आर्थिक सुधारणांपायी अनेकानेक भारतीय कंपन्यांनी उत्तुंग उंची व दर्जा प्राप्त केला असून, अनेकदा त्यांची अमेरिकी कंपन्यांबरोबर थेट स्पर्धा होताना दिसते. पण या व्यावसायिक प्रतिस्पर्धेला राजकीय मंच मिळवून देणे गैर असल्याचे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक स्पर्धा ही कोणत्याही मुक्त बाजारपेठ आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा कणा असतो.’’
श्रोतृवर्गात उपस्थित बडय़ा कंपन्यांचे प्रमुख, अधिकारीगण आणि धोरणकर्त्यांना उद्देशून चिदम्बरम यांनी भारताच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला अमेरिकी उद्योगधंद्यांच्या मदतीची गरज असल्याचे आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेला वीटेवर वीट रचून आकार देत आहोत आणि या प्रक्रियेत तुमचा हातभार आम्हाला हवा आहे. माझे आपणास आवाहन आहे की, दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची ही एक मोठी संधी आहे.’’
भारताकडे प्रचंड मोठी युवा लोकसंख्या आहे जी भुकेने आसुसलेली आणि प्रचंड आकांक्षापूर्ण आहे. हा प्रचंड गुणवंतांचा समुच्चय आजही बहुतांश पुरेपूर वापरात आलेला नाही. म्हणूनच आपण एकत्रपणे काम करण्यात उभयतांचे हित आहे. एका समृद्ध समाजाच्या उभारणीसाठी आपण आज, उद्या आणि भविष्यातही एकत्रपणे काम करण्याच्या नवनवीन संधी शोधत राहू, असा विश्वासही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केला.