जर्मन उद्योगसमूह ड्रेगरचे एक अंग असलेल्या ड्रेगर सेफ्टी इंडिया प्रा. लि. कंपनीने ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’ या सरकारी उपक्रमासह सुरू केलेल्या ‘मिशन सुरक्षा’ उपक्रम यापुढेही अव्याहत सुरू राहील, अशी घोषणा मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उभयतांकडून करण्यात आली.
औद्योगिक अपघातांना पायबंद घालून सुरक्षाविषयक उपकरणे व साधनांच्या वापराबाबत जागृती व प्रोत्साहन देणारा हा अशा प्रकारच्या देशातील प्रथमच राबविलेल्या उपक्रमाने अलीकडेच यशस्वी वर्षपूर्ती केली. कामगारांसाठी बेपर्वाई व अपघात हा जेथे जिवावर बेतणारा ठरतो अशा तेल व वायू, खते, रसायने, बांधकाम, अवजड उद्योग अशा १९ राज्यातील ९१ शहरांतील १७० प्रकल्प स्थळ व औद्योगिक वसाहतींच्या ३० हजार किलोमीटरचा प्रवास ड्रेगरद्वारे फिरत्या कार्यशाळेने केला.
सर्व सुरक्षा सामग्री व उपाययोजनांनी सुसज्ज अशा ट्रकचा वापर या कार्यशाळेत करण्यात आला. सोबत ड्रेगरचे अभियंते व नॅशनल सेफ्टी कौन्सिलच्या तज्ज्ञ संचालकांचे मार्गदर्शन, परिसंवाद हा या वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३० हजार लोकांपर्यंत पोहचले, असा दावा कंपनीचे विपणन व्यवस्थापक मिलिंद देशपांडे यांनी केला. या उपक्रमाचे नियोजन प्रारंभी १८ महिने कालावधीसाठी केले होते, पण आजवरचा प्रतिसाद पाहता तो सतत सुरू राहणारा उपक्रम बनविण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.