शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांच्या सार्वकालिक उच्चांकाला गवसणीसोबतच, म्युच्युअल फंड उद्योगाकडे जमा झालेली एकूण गंगाजळीही विक्रमी ९ लाख कोटींच्या उच्चांकासमीप पोहचली असल्याचे दिसून येते.
नोव्हेंबर २०१३ अखेर म्युच्युअल फंडांची एकूण गंगाजळीने ८,८९,९५२ कोटी रुपयांचे शिखर गाठले आहे. विशेषत: लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंडांमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीच्या पाश्र्वभूमीवर केवळ नोव्हेंबर महिन्यात ५५,९९१ कोटी रुपयांची भर गंगाजळीत पडली आहे. दिवाळीच्या तोंडावर भांडवली बाजाराबद्दल सकारात्मकता आणि गुंतवणूकदारांच्या बदललेल्या भावनांचा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये कैक महिन्यांनंतर लक्षणीय ओघ दिसून आला.
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ६९९ कोटी रुपयांची नक्त भर पडली, जी गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. त्या आधीच्या ऑक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतल्याने, इक्विटी फंडातील गंगाजळीला तब्बल ३,५४२ कोटी रुपयांनी कात्री लागली होती.
तथापि, सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’ योजनांमध्ये सलग सहाव्या महिन्यात ओघ आटला असल्याचे नोव्हेंबरमध्ये दिसून आले. या महिन्यात या योजनांनी रु. १३१ कोटी गमावले. परिणामी गोल्ड ईटीएफच्या एकूण गंगाजळी रु. ५६९ कोटींनी ओसरून रु. ९,३२५ कोटींवर स्थिरावली आहे.
गंगाजळीची विभागणी (कोटी रु.)
म्युच्युअल फंड प्रकार    नोव्हे. २०१३    ऑक्टो २०१३    तफावत
उत्पन्न योजना (इन्कम फंड)    ४,३१,०५०    ४,३३,९७०    -२९.२०
इक्विटी फंड     १,७५,१२६    १,७३,४५३    १६.७५
बॅलेन्स्ड फंड     १६,१३५    १६,१४१    -०.०६
लिक्विड/मनी मार्केट फंड    २,४६,४०१    १,८९,१४९    ५७२.५२
गिल्ट फंड    ७,९९६    ७,४९७    ४.९९
गोल्ड ईटीएफ फंड    ९,३२५    ९,८९४    -५.६९
अन्य ईटीएफ फंड    १,४३७    १,४३६    ०.०१
फंड्स ऑफ फंड्स     २,४८०    २,४२१    ०.५९
(विदेशात गुंतवणूक योजनांसह)
एकूण    ८,८९,९५२    ८,३३,९६१    ५५९.९१