वाढलेल्या वाहन अधिभारामुळे उद्योगाला भीती
डिझेल वाहनांबाबतची अनिश्चितता आणि वाहनांवरील वाढीव उत्पादन शुल्काने वाहन उद्योगाचे धैर्य खचले असून या क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने चालू वर्षांत या क्षेत्राची वाढ ६ ते ८ टक्के राहील असे म्हटले आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम)कडून गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा देशातील प्रवासी कार विक्रीचा अंदाज खुंटविण्यात आला आहे. यापूर्वी हा अंदाज दुहेरी आकडय़ात- ११ ते १२ टक्क्यांपर्यंतचा वर्तविण्यात आला होता. मोटरसायकल विक्रीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ तर गिअरलेस स्कूटर विभागाची विक्री १९ टक्क्यांपर्यंत होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. मार्च २०१६ मध्ये देशातील प्रवासी कार विक्री ८ टक्क्यांनी वाढली आहे.
पर्यावरणामुळे डिझेल वाहनांबाबतचे सरकारचे धोरण अद्यापही अनिश्चित असून मार्चपासून प्रवासी वाहनांवर लागू झालेल्या वाढीव शुल्काचाही या क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले.
परिणामी नजीकच्या काही वर्षांमध्ये दुहेरी आकडय़ात होण्याची शक्यता फेटाळताना, नव्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षांत हे क्षेत्र ६ ते ८ टक्क्यांनी वाढेल असे वाटते, असे सेन यांनी सांगितले.