वर्षांरंभाला औद्योगिक उत्पादन घसरणीला; रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण निर्णायकी ठरणार

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीमुळे किरकोळ महागाई दराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. फेब्रुवारीमधील २.५७ टक्के दर गेल्या चार महिन्यांतील सर्वोच्च ठरला आहे. तर निर्मिती क्षेत्रातील मंदीमुळे २०१९ च्या सुरुवातीलाच औद्योगिक उत्पादन दर १.७० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. हे दोन्ही कल रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या महिन्यात होणाऱ्या व्याजदर निश्चितीकरिता महत्त्वाचे ठरतील.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या महिन्यातील महागाईचा दर जानेवारीतील १.९७ टक्क्यांच्या तुलनेत अधिक तर वर्षभरापूर्वीच्या, फेब्रुवारी २०१८ मधील ४.४४ टक्क्यांच्या तुलनेत काहीसा कमी आहे.

गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या किमती आधीच्या महिन्यातील उणे स्थितीतून काहीशा उंचावत ०.६६ टक्क्यावर गेल्या आहेत. यापूर्वी किमान महागाई दर नोव्हेंबर २०१८ मध्ये २.३३ टक्के होता.

जानेवारीत औद्योगिक उत्पादन दर निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीने खाली आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये दर थेट ७.५ टक्के होता. यंदा ऊर्जानिर्मितीही ०.८ टक्क्यावर येऊन ठेपली आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१८ मध्ये दर २.६ टक्के होता. यंदा निर्मिती क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या ८.७ टक्क्यांवरून थेट १.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान औद्योगिक उत्पादन दर ४.४ टक्के नोंदला गेला आहे. वार्षिक तुलनेत याच कालावधीत तो ४.१ टक्के होता.