भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात यूएस फेडरल रिझव्‍‌र्हची धुरा हाती घेण्यासाठी अत्यंत सुयोग्य उमेदवार आहेत, असे मत जागतिक वित्तविषयक नियतकालिक ‘बॅरन्स’ने व्यक्त केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेडरल रिझव्‍‌र्हच्या नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा करणे अपेक्षित आहे. फेडच्या विद्यमान अध्यक्षा जॅनेट येलेन या नव्या वर्षांच्या सुरुवातीला निवृत्त होत आहेत, त्यांचे वारसदार म्हणून संभाव्य उमेदवारांच्या यादीत रघुराम राजन यांचे नाव नसल्याबद्दल ‘बॅरन्स’ने आपल्या टिप्पणीत खेदयुक्त आश्चर्य व्यक्त केले आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांच्या पंक्तीत सर्वात चमकदार कामगिरी राहिलेल्या राजन यांना डावलले जाणे अनुचित असल्याचे म्हणत, चलनवाढीच्या दरात लक्षणीय उतार, चलन विनिमय मूल्यात स्थिरता आणि भांडवली समभाग मूल्यांमध्ये ५० टक्क्य़ांहून अधिक वाढ अशा राजन यांच्या भारतातील अल्पावधीच्या कारकीर्दीच्या वैशिष्टय़ांचा या टिपणात गौरव करण्यात आला आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे राजन यांनी प्रत्यक्ष जागतिक वित्तीय अरिष्टाच्या  खूप आधी त्याचे अचूक भाकीत केले होते.

जसे एखाद्या क्रीडा संघात जगभरातील गुणवानांना हेरून निवडले जाते, ही पद्धत मध्यवर्ती बँकेचा प्रमुख निवडताना का अनुसरली जाऊ नये, असाही ‘बॅरन्स’च्या या टिपणाचा सवाल आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या प्रमुखपदी कॅनडात जन्मलेले मार्क कार्नी राहिले आहेत, त्यामुळे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख पद देशाचे नागरिक नसलेल्यांनी भूषविण्याचे उदाहरण घडून गेले असल्याचे ‘बॅरन्स’ने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ आणि भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका बजावल्यानंतर, राजन यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे सर्वात तरुण गव्हर्नर म्हणून सप्टेंबर २०१३ पासून तीन वर्षांची कारकीर्द राहिली आहे. आधीच्या गव्हर्नरांना मुदतवाढ दिली जाण्याचा प्रघात असतानाही राजन यांना तशी संधी नाकारण्यात आली. मोदी सरकारने मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव आपल्यापुढे न ठेवल्यामुळे पायउतार होण्याचा निर्णय आपण घेतल्याचे राजन यांनी अलीकडेच प्रकाशित त्यांच्या पुस्तकातून खुलासा केला आहे. अर्थशास्त्राच्या २०१७ सालच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी म्हणून संभाव्य उमेदवारांमध्ये राजन यांचे एक नाव होते.