‘पीएमसी बँक’ प्रकरणानंतर नागरी सहकारी बँकांची भावना; रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यस्थीबाबत समाधान

मुंबई : अनेक नागरी सहकारी बँका या व्यावसायिकता तसेच संपूर्ण नियमपालनासह शिस्तीने चालविल्या जात आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याच्या प्रकरणानंतरही, या नागरी सहकारी बँकांच्या उजळ कामगिरी आणि विश्वासार्हतेला धक्का पोहोचणार नाही, अशी भावना सहकार क्षेत्रातील बडय़ा बँकांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने याप्रकरणी दाखवलेली तत्परता आणि मध्यस्थीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या शिष्टमंडळाशी मंगळवारी संवाद साधून, रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेतील ठेवी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर याप्रकरणी लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एकूणच सहकारी बँकिंग क्षेत्राविषयी अविश्वास आणि भीतीचे निवारण करण्याच्या दृष्टीने हे खूपच उपकारक ठरले आहे, अशी या क्षेत्राची एकंदर प्रतिक्रिया आहे. केवळ एका बँकेत घडलेला घोटाळा म्हणूनच त्याकडे पाहिले जावे, अन्य बँकांना त्यात गोवले जाणे गैर आहे, हेच यातून सुचविले गेले आहे, असे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

नागरी सहकारी बँकांचा महाराष्ट्रातील एकूण बँकिंग व्यवहारात जवळपास १० टक्के वाटा आहे. शेतकऱ्यांच्या सावकारी पाशातून मुक्ततेसह, कृषी क्रांती आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेतही सहकारी बँकांचे मोठे योगदान आहे. नागरी सहकारी बँकांची कामगिरी अनेक सरकारी बँकांच्या तुलनेत उजवी असून, त्यांच्या अनुत्पादित मालमत्ता अर्थात ‘एनपीए’चे प्रमाण हे सरकारी बँकांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. सारस्वत बँक ही मराठी माणसांनी एकत्र येऊन उभारलेली भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील क्रमांक एकची सहकारी बँक आहे, असेही ठाकूर यांनी नमूद केले. स्थापनेपासून गेल्या १०१ वर्षांत सलगपणे नफा कमावणारी ही बँक आहे. मार्च २०१९ अखेर आजवरचा सर्वाधिक २९१ कोटी रुपयांचा नफा बँकेने कमावला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पीएमसी बँकेच्या प्रकरणी ठेवीदारांच्या प्रश्नावर तोडग्याच्या दिशेने सकारात्मक आणि खूप जलदरीत्या रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकारचीही पावले पडताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाचे सदस्य आणि ‘सहकार भारती’चे सतीश मराठे यांनी नोंदविली. सहकारी बँकिंग क्षेत्राविषयी आत्मीयता दिसत असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होत असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, विषय पत्रिकेवर हा मुद्दा असून या संबंधाने आपण सविस्तर सादरीकरण करणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.

संपूर्ण संचालक मंडळ उच्चशिक्षित, निपुण व्यावसायिक आणि बँकिंगचे ज्ञान असलेले आणि विशेष म्हणजे पूर्ण राजकारणविरहित अशी एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेने ओळख निर्माण केली आहे, असे या बँकेचे उपाध्यक्ष सुनील गायतोंडे यांनी सांगितले. स्थापनेला १०३ वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सामान्य सभासदांकडूनही ते राजकीय पक्षांशी संलग्न नसल्याचे हमीपत्र घेतले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर व शिस्तीने पालन करण्यासह, बँकेकडून मुख्यत: कर्ज वितरणात स्वयं-नियमन पाळले जाते. त्यामुळे कोणाही एका खातेदाराचा बँकेच्या एकूण कर्जवितरणात एक टक्क्यापेक्षा अधिक मर्यादेपल्याड हिस्सा नाही, असे गायतोंडे यांनी सांगितले. यातून एनकेजीएसबी बँकेची व्यावसायिक प्रगती इतरांप्रमाणे वेगवान नसली तरी स्थिर व भक्कमपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

परिस्थिती नाजूक असून, संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राला बट्टा लागण्यापासून वाचविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून योग्य तो हस्तक्षेप हा या क्षेत्राच्या विश्वासार्हतेच्या दिशेने लाभकारक ठरला आहे, असे मत ‘महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे आवर्जून नमूद केले असून, सध्याच्या स्थितीवर उपायांच्या दृष्टीने फेडरेशनने केलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

सारस्वत बँकेची स्थिती उत्तम

२३ ऑक्टोबर रोजीच्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘विविध बँकांचे त्रस्त ठेवीदार एकाच मंचावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त हे आंदोलक समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिले गेले. मात्र, ते वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असून, सारस्वत बँकेची स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे.