अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचा नवरात्रौत्सवात नऊ अर्थ-विश्लेषकांकडून वेध..

समीर नारंग ( मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा)

भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा पुरेसा मजबूत असल्याने तात्पुरत्या धक्याने अर्थव्यवस्थेस बाधा पोहोचेल असे सध्या तरी वाटत नाही. अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठय़ाचा विचार केला तर घरगुती मागणी अजूनही मोठी असल्याने अर्थव्यवस्था मंदावली असे जाणवत नाही. केंद्र आणि विविध राज्य सरकारे अर्थव्यवस्थेत मागणी मंदावणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. केंद्र सरकारने निवडक धान्यांच्या आधारभूत किंमतीत वाढ केल्याचा परिणाम दिसण्यास थोडा काळ जावू द्यावा लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मागणी लवकरच वाढलेली दिसेल. नवीन क्षमता वाढविण्यासाठी बँकांच्या कर्जात उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्याची आकडेवारी याचीच साक्ष देत आहेत.

दुसऱ्या बाजुला कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि वाढणारे व्याजदर काळजीत भर घालण्यास नक्कीच कारण आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती  ८५ डॉलर प्रति पिंपनजीक असून नजीकच्या काळात ते खाली येतील असे वाटत नाही. सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरच्या मूल्यवर्धित करात केलेल्या कपातीमुळे वित्तीय तूट वाढण्याचा धोका आहे. दुसऱ्या बाजुला रुपयातील घसरणीमुळे वित्तीय तूट वाढून महागाई वाढण्याचा अर्थव्यवस्थेला असलेला धोका नजरेआड करून चालणार नाही. वाढते व्याजदर आणि वाढती महागाई याचा परिणाम चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहित प्रकर्षांने जाणवेल. या सर्व बाजूंचा साक्षेपाने विचार केल्यास आम्हाला अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर किमान  ७ टक्के राहील अशी आशा वाटते.

सद्य आर्थिक वर्षांच्या देशाच्या निर्यातीने नोंदविलेला १६ टक्के वृद्धी दर ही काळ्या ढगाची रुपेरी किनार आहे. डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या घसरणीमुळे अन्य देशांना भारतातून आयात करणे स्वस्त झाल्यामुळे निर्यातीत वाढ झालेली दिसेल, अशी अपेक्षा आहे. थेट विदेशी गुंतवणुकीत २३ टक्के वाढ झालेली दिसून आली. मागील वर्षांत वस्तूंची उच्चांकी निर्मिती झाली. शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर पेरणी केल्यामुळे मागील वर्षांचा शेतीमालाच्या उत्पादनाचा उच्चांक येत्या आर्थिक वर्षांत मोडला जाण्याची शक्यता आहे. बंदरातील माल हाताळणी आणि व्यापारी वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ भारताच्या वाढीव अर्थव्यवस्थेस अजूनही वाव आहे असे मानावयास नक्कीच हरकत नाही. दीर्घकालीन विचार केल्यास अर्थव्यवस्थेवर चिंतामग्न होऊन केलेली टीका म्हणजे शब्द बापुडे केवळ वारा अशा स्वरूपाची म्हणावी लागेल.

(लेखकाची मते वैयक्तिक स्वरूपाची असून ती बँक ऑफ बडोदाची प्रातिनिधिक मते नव्हेत)