News Flash

वित्तीय नियोजकाचे साहाय्य का घ्यावे?

आर्थिक सल्लागाराचे आपल्या आयुष्यात कितीसे महत्त्व आहे?

संग्रहित छायाचित्र

|| भालचंद्र जोशी

आर्थिक सल्लागाराचे आपल्या आयुष्यात कितीसे महत्त्व आहे? ज्याप्रमाणे आपल्याला फॅमिली डॉक्टरची गरज असते त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागारही हवा! आपल्या आर्थिक सल्लागाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी परिचित असणे आवश्यक आहे. तरच त्याला आपल्यासाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचे पर्याय निवडता येतील.

आर्थिक सल्लागार ग्राहकांना आर्थिक नियोजनाला अनुसरून सल्ला आणि नियोजनानुसार आर्थिक साधनांची निवड करतात. आर्थिक सल्लागार गुंतवणूक व्यवस्थापन, आयकर व्यवस्थापन आणि मालमत्ता नियोजन यासारख्या विविध सेवा प्रदान करतात. यशस्वी सल्लागार बनण्यासाठी त्याच्याकडे उत्कृष्ट संवाद साधण्याची कला आणि ऐकण्याचे कौशल्य, अवघड माहिती सहज आणि स्पष्टपणे समजावून सांगण्याची क्षमता, ग्राहकांशी संबंध स्थापित करण्याचे कौशल्य, प्रसंगी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकाच्या चुकीच्या समजांना विरोध करण्याचे धारिष्टय़ आदी गुण असणे आवश्यक आहे.

सल्लागाराचे ज्ञान, अनुभव किती?

मालमत्ता विभाजनाचा समतोल राखणे, म्युच्युअल फंडाची योजना समजून घेणे आणि पोर्टफोलिओत होणाऱ्या बदलाचा तुमच्या आर्थिक नियोजनावर कसा परिणाम होतो हे नीट समजण्यासाठी भरपूर अनुभव असावा लागतो. त्यामुळे सल्लागाराची शैक्षणिक पात्रता किती आहे आणि त्याच्यापाशी किंवा तिच्यापाशी किती अनुभव आहे हे तुम्ही तपासून पाहिले पाहिजे. म्युच्युअल फंड सल्लागार आणि त्याची कंपनी यांना वेगवेगळ्या मालमत्ता जसे की समभाग, रोखे, स्थावर मालमत्ता गुंतवणुकीचे कसब असले पाहिजे आणि सल्लागाराला तुमच्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय योग्य आहे का हे निश्चित करून त्याचा योग्यवेळी उपयोग करता आला पाहिजे.

गरजेला उपलब्धता?

तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक करण्याचा निर्णय ज्याच्यावर सोपवता तो सल्लागार तुम्हाला गरज असेल तेव्हा आणि तसा उपलब्ध असला पाहिजे. सल्लागार किंवा त्याचे सहकारी तुमच्या प्रश्नांची वाजवी वेळेत उत्तरे देऊ  शकले पाहिजेत आणि ई-मेलद्वारे किंवा व्यक्तिश: दूरध्वनीद्वारे उपलब्ध असले पाहिजेत. आर्थिक विश्वात वेळ फार महत्त्वाची असते आणि अगदी अल्पवेळेत त्याला तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करता आली पाहिजे.

सर्वसमावेशक सल्ला देऊ शकेल?

बहुतेक गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक बाबतीत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत खूप जास्त लोकांबरोबर पुन्हा पुन्हा चर्चा करण्याची इच्छा नसते. कारण या गोष्टी गुप्त असतात. त्यांना असा सल्लागार हवा असतो जो त्यांच्या गुंतवणुकीच्या गोपनीयतेचे पालन करेल. सल्लागार असा असावा ज्याची बांधिलकी एका विशिष्ट फंड घराण्यापेक्षा तुमच्या वित्तीय ध्येयाशी असेल.

सल्लागारांचा मोबदला?

सल्लागार अशा वितरणाच्या मॉडेलचा उपयोग करतो का, जेथे त्याला तुम्ही केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीसाठी फंड घराण्यांकडून मोबदला मिळतो काय, याची चौकशी करा. अन्यथा काही सल्लागार दिलेल्या सेवेसाठी शुल्क आकारतात, जे त्यांनी तुमच्यावर खर्च केलेल्या वेळेवर अवलंबून असते. अशी अनेक ऑनलाइन पोर्टल्सही आहेत जी तुमच्याकडून माहिती गोळा करून तुम्हाला गुंतवणुकीचे नियोजन करण्यास मदत करतात आणि त्यांच्यामार्फत केलेली गुंतवणूक अतिशय कमी खर्चात असू शकते. सर्वसमावेशक आर्थिक नियोजनासाठी मेहनतीची गरज असते, आणि त्यात तुमची जोखीम घेण्याची क्षमता, भविष्यातील गरजा आणि जीवनातील उद्दिष्टे यांचा विचार केला जातो.

म्युच्युअल फंड वितरकाने गुंतवणूकदाराची परिस्थिती / जोखीम प्रोफाइल समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराची गरज लक्षात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय सुचवावा. दुसरीकडे, आर्थिक सल्लागार एक विस्तृत चित्र पाहू शकतो, ज्यात गुंतवणूकदाराची मालमत्ता, वित्तीय ध्येये उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालता येतो.

आर्थिक नियोजन हे गुंतवणूक करण्यापेक्षा मोठे आहे. यात आपल्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, परदेश सहल, निवृत्ती नियोजन आणि कर सल्ला इत्यादी देखील समाविष्ट आहेत. म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनविणे आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत समज गुंतवणूकदारांना हवी आणि यासाठी एक वित्तीय सल्लागार नेमणे अतिशय आवश्यक असते. सल्ला आणि व्यवहार या दोन गोष्टी भिन्न आहेत. एखाद्या वितरकाकडून गुंतवणूक केली म्हणून त्याने मोफत आर्थिक नियोजन करून द्यावे असे नव्हे!

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:56 am

Web Title: financial experts guidance 2
Next Stories
1 बाजारावर भरवसा नाय काय?
2 पैल तो गे काऊ कोकताहे
3 घरभाडे उत्पन्नातील तोटय़ाची वजावट फक्त दोन लाखांपर्यंतच!
Just Now!
X