19 November 2017

News Flash

‘फिस्कल क्लिफ’

जागतिक अर्थकारणाची दिशा व दशा प्रामुख्याने अमेरिकेच्या अर्थकारणावर ठरते हे नि:संशय. अगदी सध्याच्या पडझडग्रस्त

प्रा. समीर वेलणकर - sammv6a@yahoo.com | Updated: December 25, 2012 4:08 AM

जागतिक अर्थकारणाची दिशा व दशा प्रामुख्याने अमेरिकेच्या अर्थकारणावर ठरते हे नि:संशय. अगदी सध्याच्या पडझडग्रस्त अमेरिकेच्या एकूण घटत्या सामर्थ्यांच्या वस्तुस्थितीचे भान बाळगूनही हे विधान खरे ठरते. जागतिक भांडवल बाजाराचे उत्तरायण अथवा दक्षिणायन अमेरिकेच्या अर्थ आकडेवारीच्या हिंदोळ्यावरच अवलंबून असते. तसेच देशादेशीच्या मध्यवर्ती बँकांच्या पतधोरण आढाव्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीची दखलही मग आवर्जून घेतली जाते. सध्या आपल्या शेअर बाजारातील तेजी टिकाऊ ठरेल की अल्पजीवी या प्रश्नाची तड ‘फिस्कल क्लिफ’ हे लक्षवेधक नामाभिधान धारण केलेल्या अमेरिकेत घोंघावत असलेल्या आर्थिक अरिष्टाचा बंदोबस्त कसा होतो यातून लागणार आहे.
या ‘फिस्कल क्लिप’नामे अरिष्टावर प्रचंड तातडीने (म्हणजे ३१ डिसेंबर २०१२ च्या आत) तोडगा काढला नाही तर प्रत्यक्ष अमेरिका व अप्रत्यक्षपणे सारे जग मंदीच्या गर्तेत खोलवर लोटले जाईल, असे भीषण भाकीत अर्थतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. मूळात दीर्घ काळ वेढा घालून बसलेला मंदीचा फेरा संपता संपत नाही. त्यात अमेरिकेत या अर्थ अनागोंदीची भर पडली तर मग बघायलाच नको.
हे टाळायचे झाल्यास विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकी संसदप्रणालीच्या रीतीप्रमाणे सर्वसहमतीने नवीन ‘दशवार्षिक आर्थिक पॅकेज’ (ओबामा प्लॅन) संमत करून १ जानेवारी २०१३ पासून अंमलात आणावा लागेल. पण ज्ञानबाची मेख दडली आहे ती सर्वसहमतीच्या राजकारणात. विद्यमान अध्यक्ष ओबामा हे डेमोक्रॅट्स पक्षाचे आहेत आणि अमेरिकी सिनेटमध्ये बहुमताचे प्रवक्ते जॉन बोह्नर रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. विरोधासाठी विरोध करणे हे आजच्या स्खलनशील राजकारणाच्या एवंगुण वैशिष्टय़ाला अमेरिकाही अपवाद निश्चितच नाही. जरठ विचारसरणी असलेल्या रिपब्लिकन पार्टीला ‘ग्रॅण्ड ओल्ड पार्टी’ असे संबोधले जाते, या पक्षाच्या नेत्यांची सहमती मिळविणे ही कर्म कठीण गोष्ट आहे. अर्थात अमेरिकेत असलेल्या अर्थसाक्षरतेमुळे उभयपक्षांना हातघाईच्या वाटाघाटींसाठी सातत्याने रेटा वाढत चालला आहे. शिवाय ओबामा यांनी निर्देशित केलेल्या धनाढय़ांनी आपणहून कुठलीही कुरकूर न करता करवाढ सोसण्याची तयारी दर्शविली आहे, हेही प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण मानता येईल. त्यामुळे सरतेशेवटी समेट घडून तात्पुरत्या मलमपट्टीने का होईना कडेलोट टाळला जाईल, अशी आशा सर्वानाच लागून राहिली आहे.    
‘फिस्कल क्लिफ’
नेमके आहे काय ?
अगदी शब्दश: नव्हे परंतु मतितार्थाने ‘फिस्कल क्लिफ’ या संज्ञेचा अर्थ होतो अर्थव्यवस्थेचे ‘टकमक टोक’. जर पुढील दोन-तीन दिवसात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तातडीच्या उपाययोजना केल्या नाहीत तर या टोकावरून मंदीच्या खाईत ‘कडेलोट’ निश्चित. अमेरिकेचे माजी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (दुसरे) यांनी तत्कालीन मरगळलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दहा वर्षांसाठीचे ‘बहुविध सवलतींची खैरात असलेले आर्थिक पॅकेज’ जारी केले होते, त्याची वैधता ३१ डिसेंबर २०१२ रोजी संपुष्टात येत आहे. २०१३ वर्षांरंभी भरघोस करसवलती आणि सरकारला बेलगाम खर्च करण्याची मुभा असणाऱ्या सर्व तरतुदी स्वयंचलित पद्धतीने रद्दबातल ठरतील. आधीच नैराश्यग्रस्त असलेल्या अमेरिकेला हा दुहेरी फटका ठरेल म्हणूनच त्याला ‘फिस्कल क्लिफ’ असे कल्पक नामाभिधान दिले गेले आहे. क्रयशक्ती हे अमेरिकनांचे मर्मस्थळ आहे. किंबहुना अमेरिकेतील रहिवासी हा प्रथम पट्टीचा ग्राहक असतो, नागरिकत्व वगैरे बाबी त्याच्या लेखी नंतरच्या ठरतात. एका रात्रीत सर्व करसवलती काढून घेऊन, क्रयशक्ती संकुचित करणे या घटनेचे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक पडसादही भीषण असतील याची विद्यमान अध्यक्ष ओबामा यांनी पूर्णत: जाणीव आहे.     

‘फिस्कल क्लिफ’चे दृश्य परिणाम (१ जानेवारी २०१३ पासून)
* सामाजिक सुरक्षा करात २% वाढ
* कर वजावटीचे लाभ संपुष्टात (उदा. संशोधनावर केलेला खर्च, मुलांच्या शिक्षणावरील खर्च इ.)
* बेरोजगार भत्ते व सुविधांमध्ये कपात
* आरोग्यनिगेवर (प्रायव्हेट डॉक्टर्स बिल) सरकारकडून मिळणाऱ्या परताव्यात ३०% कपात
* संरक्षण खर्च व सरकारी योजनांना काटकसर लागू
परिणाम :
* क्रयशक्तीवर कुऱ्हाड,
* बेरोजगारीत वाढ,
* सामाजिक सुरक्षा योजनांचा संकोच
* नागरिकांचे आर्थिकदृष्टय़ा खच्चीकरण
* शेअर बाजारात नकारात्मक पडसाद
* जगभरात मंदीची लाट
कडेलोट टाळण्यासाठी प्रस्तावित ‘ओबामा प्लॅन’
* करविषयक सुधारणांद्वारे पुढील १० वर्षांत १.२ ट्रिलियन डॉलर महसूलप्राप्तीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट
१ ट्रिलियन= १ लाख कोटी (एकावर १२ शून्य)
* १० वर्षांत एकूण १.२२ ट्रिलियनची खर्चकपात, ८०० अब्ज डॉलरची काटकसर
* उच्च-उत्पन्न गटावर (दोन टक्के अमेरिकी नागरिकांवर) कमाल कर आकारणी ३९.६%
* सामाजिक सुरक्षा, पेन्शन, बेरोजगार भत्ता,  आरोग्यनिगा सवलतींच्या व्याप्तीत वाढ, जास्तीत जास्त लोकांना या छत्राचा लाभ
परिणाम :
* फारसे उत्साहवर्धक नसले तरी कडेलोट होणार नाहीत इतपत सहनीय.
 (लेखक खालसा पदवी महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्राध्यापक आहेत)

First Published on December 25, 2012 4:08 am

Web Title: fiscal clief