जागतिक मंदावलेपणात भारताची आर्थिक स्थिरता अजोड – जेटली
भारतात रस्ते, रेल्वे आणि ऊर्जेच्या क्षेत्रात विदेशी भांडवल गुंतवणुकीला आमंत्रित करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीतील सरकारी मालकीच्या सार्वभौम निधी व्यवस्थापकांची गुरुवारी येथे भेट घेतली. सबंध जगाला आर्थिक मंदीने वेढले असताना, भारताच्या अर्थव्यवस्थेने दाखविलेली स्थिरता निश्चितच विदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षण बिंदू ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येथे आयोजित दोन दिवसांच्या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, जेटली यांनी भारतात उपलब्ध विविधांगी संधींचा पाढा उपस्थितांपुढे वाचून दाखविला. रस्ते, महामार्ग, तेल व वायू, नागरी पायाभूत सोयीसुविधा आणि रेल्वे या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक सरकारला हवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निमित्ताने त्यांनी अनेक संभाव्य गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळांशी बंद दरवाजाआड चर्चा- वाटाघाटीही केल्या. युरोपीय गुंतवणूक बँक आणि सिंगापूर व अरब अमिरातील सार्वभौम वेल्थ फंडांचा यात समावेश होता.
भारतीय बाजारपेठेने आपली विश्वासार्हता दमदारपणे स्थापित केली आहे आणि आता भारतीय अर्थव्यवस्थेला अशीच जागतिक विश्वासार्हता मिळेल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. यासाठी केवळ आर्थिक सुधारणा व निरंतर सुधारणा पथ अनुसरणे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरेल.