मुंबई : देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात एनएसईने जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांचा बाजारमंच म्हणून स्थान कमावले आहे. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन (एफआयए)कडून उपलब्ध आकडेवारीनुसार, सरलेल्या २०१९ सालात एनएसईने डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांच्या एकूण सौद्यांच्या संख्येनुसार पहिल्या स्थानावर असलेल्या सीएमई ग्रुपला मागे टाकले आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेस (डब्ल्यूईएफ)कडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, रोखीने झालेल्या समभाग व्यवहारांच्या संख्येनुसार, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बाजारमंच म्हणून एनएसईचे मानांकन आहे.

भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक अर्थपुरवठा आणि २०२४-२५ सालापर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साकारण्यासाठी बाजारमंचाचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. दमदार भांडवली बाजार हे देशाच्या अर्थवृद्धीसाठी केवळ पतपूरक नाहीत, तर युवकांसाठी रोजगाराच्या संधीही त्यातून निर्माण होत असतात, अशी या संबंधाने प्रतिक्रिया एनएसईचे व्यवस्थापैकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी व्यक्त केली. जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या व्यापक विश्वास आणि सहभागामुळे ही कामगिरी करणे शक्य झाले, असेही त्यांनी नमूद केले.

मागील पाच वर्षांत, एनएसईवर समभागांचे रोख प्रकारातील व्यवहार हे तब्बल ९० टक्क्य़ांनी वाढले आहेत. २०१५ सालात (जानेवारी ते डिसेंबर) अशा दैनंदिन व्यवहारांचे प्रमाण १७,५७२ कोटी रुपये होते, ते २०१९ सालात दैनंदिन ३४,२६४ कोटी रुपयांवर गेले आहेत. याच कालावधीत समभागांच्या डेरिव्हेटिव्हज व्यवहारातील दैनंदिन उलाढालही, २०१५ मधील ५२,३७१ कोटींवरून, २०१९ मध्ये ८८,७७२ कोटी रुपये अशी ७० टक्क्य़ांनी वाढली आहे. शिवाय, या कालावधीत एनएसईवर रोख बाजारातील व्यवहारांमध्ये डिलिव्हरीची टक्केवारीदेखील ६० टक्के अशी उमदी राहिली आहे.

पाच वर्षांत १.२ कोटी नवगुंतवणूकदार

भारतातील भांडवली बाजाराच्या सखोलतेमुळेच समभागांचे रोखीतील आणि डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांमध्ये वाढ होऊ शकली आहे. मागील पाच वर्षांत एनएसईने समभागांच्या रोखीतील व्यवहारांसाठी १.२ कोटी नव-गुंतवणूकदारांची नोंदणी अनुभवली आहे. यापैकी ८७ लाख नव-गुंतवणूकदार गत तीन वर्षांत नोंद झाले आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या नवगुंतवणूकदारांपैकी एक-तृतीयांश हे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शहरे व नगरांमधून आलेले आहेत. गुंतवणूकदारांकडून डिजिटल साधनांचा वाढता अवलंब ही आणखी एक सुखावणारी बाब असून, समभागांच्या रोखीतील व्यवहारांचा २६ टक्के  हिस्सा हा मोबाइल आणि इंटरनेटद्वारे होणाऱ्या व्यवहारांचा आला आहे.