News Flash

सोने एक ‘वंडर कमोडिटी’

जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असली तरी सोन्याचा भाव ठरवण्यामध्ये भारताला काडीचीही किंमत नाही.

( संग्रहीत छायाचित्र )

|| श्रीकांत कुवळेकर

जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असली तरी सोन्याचा भाव ठरवण्यामध्ये भारताला काडीचीही किंमत नाही आणि अर्थात, त्याला भारतीय वृत्तीच जास्त जबाबदार आहे.

गेले काही महिने या सदरातून आपण कृषी क्षेत्राशी निगडित असलेले घटक आणि त्यांचा कमोडिटी बाजार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम याविषयी लिहिले आहे आणि यापुढेदेखील त्याविषयी लिहिले जाईल. मात्र त्याचवेळी भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित असूनदेखील कृषी क्षेत्राशी प्रत्यक्षपणे निगडित नसलेल्या एका महत्त्वाच्या अशा कमोडिटीबद्दल लिहिण्यासाठी ही वेळ सयुक्तिक ठरावी. ही कमोडिटी जगामध्ये सर्वात जास्त व्यापार होणाऱ्या वस्तूंमध्ये सर्वोच्च स्थानी असून भारतामध्ये या वस्तूला वेगवेगळ्या जाती, धर्म आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळे स्थान आहे. कधी ही वस्तू कमॉडिटी म्हणून गणली जाते, कधी चलन म्हणून तर कधी मंगलप्रसंगी देवाणघेवाणीची वस्तू अशी वेगवेगळ्या रूपामध्ये वापरली जाते. आता निदान भारतीय नागरिकाला तरी सांगण्याची गरज नाही की अशी वस्तू म्हणजे एकच, ती म्हणजे सोने.

होय. सोने ही भारतातील ‘वंडर कमोडिटी’ आहे. म्हणजे सोन्याविषयीचे लिखाण जगातील १९० देशांतील जवळपास सर्वच देशांमध्ये वाचले जाते. तरीही भारतीय माणसाचे सोन्याविषयीचे प्रेम अगदी आपल्या मुलाला लाडाने ‘सोन्या’ म्हणण्यापासून ते मुलीच्या लग्नात, म्हणजे अगदी सासरच्या माणसांनी मागितले नसले तरीही आपली पत आणि समाज काय म्हणेल या लाजेखातर जबरदस्ती सोने देण्यापर्यंतच्या प्रवासात पदोपदी व्यक्त होत असते. अतिशयोक्ती ठरू नये, परंतु काही समाजांमध्ये तर शवाला अग्नी देताना तोंडात सोन्याचा तुकडा ठेवला जातो. खरे तर संपूर्ण जगात केवळ भारतीय माणूसच सोन्यामध्ये आर्थिक म्हणण्यापेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त करतो. वर म्हटल्याप्रमाणे भारतातील सोन्याच्या मागणीपैकी निदान ६० टक्के तरी ग्रामीण भागामधून येते. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सोने यांचे घट्ट नाते आहे. थोडक्यात, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सोन्याचा वापर करणाऱ्या देशात सोन्याकडे डोळसपणे गुंतवणूक करण्यामध्ये मात्र अतिशय उदासीनता आहे.

आता जेमतेम तीन आठवडय़ांत दसरा आणि दिवाळी येत आहे. सोने खरेदीसाठी हा सर्वात मोठा हंगाम समजला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या माहितीच्या महास्फोटामुळे सोन्याविषयी बरीच माहिती लोकांपर्यंत पोहोचत असली तरी एवढय़ा अफाट माहितीमधून आपल्या फायद्याची नेमकी कोणती, याविषयी बऱ्यापैकी अनभिज्ञता दिसून येते. या लेखामधून सोन्याविषयी काही महत्त्वाची माहिती करून घेऊ, तसेच पुढील लेखामध्ये सोन्यामध्ये भावनिक गुंतवणुकीऐवजी ‘स्मार्ट इन्व्हेस्टमेंट’ कशी करू शकता येईल याची माहिती घेऊ.

तर २०१६ पर्यंत भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक होता. मात्र दोन वर्षांपासून चीनने भारताला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. भारताची वार्षिक मागणी सुमारे १,००० टन एवढी असते आणि देशांतर्गत उत्पादन जवळपास मागणीच्या एक टक्का म्हणजे आठ-दहा टन. त्यातही खाणीतून होणारे उत्पादन जवळपास शून्य. मात्र तांबे आणि इतर काही धातूंचे उत्पादन होताना सोने उप-उत्पादन म्हणून मिळते. अर्थातच, वार्षिक १,००० टन आयात ठरलेली. आजच्या बाजारभावाने सुमारे ३००,००० कोटी रुपये किंवा सुमारे ४० अब्ज अमेरिकन डॉलरएवढे परकीय चलन आपण सोन्याच्या आयातीवर खर्च करतो. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश असला तरी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, पेरू, रशिया तसेच काही आफ्रि की देश येथून आपण सोने आयात करतो.

जगातील सर्व प्रमुख उत्पादकांसाठी भारत ही वर्षांनुवर्षे सर्वात मोठी बाजारपेठ असली तरी सोन्याचा भाव ठरवण्यामध्ये भारताला काडीचीही किंमत नाही ही न पटण्यासारखी गोष्ट असली तरी वस्तुस्थिती आहे. अर्थात, त्याला भारतीय वृत्तीच जास्त जबाबदार आहे. कारण कुठल्याही भावात सोने फक्त विकत घ्यायची वस्तू आहे अशी मानसिक वृत्ती असल्यामुळे भारतामध्ये सोन्याला कायमच मागणी असते. मात्र या वृत्तीचा एक सुप्त असा फायदा म्हणजे भारतामधील घराघरांमध्ये आणि मंदिरांमध्ये आज घडीला सुमारे २५,००० टन सोन्याचे घबाड निर्माण झाले आहे. सरकारी आकडेवारीच असे दर्शविते. म्हणजे आज भारताचा जागतिक बाजारभाव ठरवण्यात भाग नसला तरी या प्रचंड साठय़ातील पाच टक्के सोने जरी प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये आले तरी भारताची सोने आयात जवळपास बंद होऊन परकीय चलन वाचून रुपया मजबूत होण्याबरोबरच देशाचा आर्थिक गाडा मजबूत होईल.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सध्याच्या सरकारने विविध सोने तारण आणि ठेव योजना आणून लोकांकडील सोने अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तसेच सार्वजनिक सुवर्णरोख्यांद्वारे सोनेखरेदी इच्छुक लोकांना प्रत्यक्ष सोने घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय ग्राहकाचा सोन्याबाबतचा विशिष्ट दृष्टिकोन बदलण्यात सरकार यशस्वी न होता सोनेखरेदी आणि आयातीवरील परावलंबित्व यात फार बदल झाला नाही.

एवढेच काय दहा टक्के आयात शुल्क आणि आता तीन टक्के वस्तू आणि सेवा कर लावूनसुद्धा सोने आयात कमी झालेली नाही. म्हणजे १,००० टन आयातीपैकी ८०० टन कायदेशीर आणि २०० टन तस्करी अशी विभागणी झाली आणि तीन दशकांनंतर परत सोने तस्करीला बरे दिवस आले असे म्हणता येईल. आज पन्नाशीत असलेल्या पिढीला चांगलेच आठवते ते म्हणजे ऐंशी आणि नव्वदीच्या दशकांमध्ये आलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये असलेला खलनायक सोन्याच्या तस्करीशी संबंधित असायचा. उलट सोन्याची तस्करी करत नसेल तर तो खलनायक कसला असे गमतीने म्हटले जायचे. सुप्रसिद्ध नट आणि कुप्रसिद्ध खलनायक अजित चित्रपटांमधून कित्येकदा बोटींमधून सोने आणताना, ते पण कित्येक पेटय़ा भरून, आम्ही पाहिलंय.

पुढे १९९१ मध्ये सोने नियंत्रण कायदा शिथिल होऊन जागतिकीकरणाच्या रेटय़ामध्ये अनेक र्निबध शिथिल झाल्यामुळे सोन्याची आयात सुलभ होऊन तस्करी समाप्त झाली. मात्र गेल्या ४-५ वर्षांतील र्निबधामुळे, विशेषत: आयात शुल्कामुळे तस्करी सुरू झाली तरी आज ती पूर्वीएवढी सोपी राहिली नाही. एकंदर यातील गमतीचा भाग सोडला तरी या अर्निबध आयातीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील येणारा ताण समजू शकतो.

गेल्या पंधरा वर्षांमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. विशेषत: पूर्वी असलेली बाजारभावातील स्थिरता जाऊन भावात प्रचंड चढ-उतार होऊ लागले. २००६ पासून सुरू झालेल्या सोन्यातील तेजीमध्ये भाव १५० डॉलर प्रति १० ग्रॅमवरून २०१३ मध्ये सुमारे ६०० डॉलपर्यंत गेला. त्यानंतर तो परत ३०० डॉलपर्यंत पडून आजमितीला ४०० डॉलर जवळ आला आहे. या परिस्थितीला जागतिक बाजारामधील आर्थिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने वायदे बाजारामध्ये होणारी प्रचंड उलाढाल मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहे. आज जागतिक आणि भारतीय वायदे बाजारात होणाऱ्या व्यवहारामध्ये सोन्याचा प्रमुख वाटा आहे. वायदे बाजार वाढतच जाणार हे सत्य स्वीकारून त्यावर टीका करण्यापेक्षा त्याचा वापर आपल्याला कसा करून घेता येईल हे आपण पुढील लेखामध्ये पाहूच. परंतु त्याव्यतिरिक्त सोने खरेदीचे इतरही पर्याय, त्यातील फायदे आणि तोटे याची माहिती घेऊन ‘स्मार्ट इन्व्हेस्टर’ कसे होता येईल हे आपण पाहू.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:56 am

Web Title: gold a wonder commodity
Next Stories
1 वित्तीय नियोजकाचे साहाय्य का घ्यावे?
2 बाजारावर भरवसा नाय काय?
3 पैल तो गे काऊ कोकताहे
Just Now!
X