शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात २२२ रूपयांची घसरण झाली. यानंतर दिल्लीतील सोन्याच्या दर ४३ हजार ३५८ रूपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर गुरूवारी अखेरच्या सत्रात सोन्याचा दर ४३ हजार ५८० रूपयांवर पोहोचला होता. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असल्याचं एचडीएफसी सिक्युरीटीजचं म्हणणं आहे.

सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी चांदीच्या दरात ६० रूपयांची घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा दर ४८ हजार १३० रूपये प्रति ग्रामवर पोहोचला आहे. गुरूवारी बाजारात चांदीचा दर ४८ हजार १९० रूपये इतका होता. “दिल्लीत शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात २२२ रूपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे घरगुती बाजारात घसरण झाली,” असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीचे दर घसरणीसह ट्रेंड होत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १ हजार ६३२ रूपये प्रति औस तर चांदीचा दर १७.२५ डॉलर्स प्रति औस इतका होता.

सोन्याच्या वायदा दरात वाढ
जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी सोन्याच्या वायदा दरात २१३ रूपयांची वाढ झाली असून दर ४२ हजार ५९८ रूपयांवर पोहोचला आहे. मल्टी कमोडीटी एक्स्चेंजमध्ये एप्रिल महिन्यात बाजारात येणाऱ्या सोन्याच्या दरात २१३ रूपयांची दरवाढ पहायला मिळाली. तर जूनमध्ये बाजारात येणाऱ्या सोन्याचा दर ३०३ रूपयांनी वाढून तो ४२ हजार ९०१ रूपये झाला आहे.