रुपयाच्या ६९ नजीक घसरगुंडीने २०१६ची अखेर

मावळते वर्ष २०१६ मध्ये सोने तसेच चांदीच्या धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पदरात लाभ पडला आहे. सोन्याने या वर्षांत ११.६८ टक्के तर चांदीने १५.९४ टक्के गुंतवणूक मूल्य प्राप्त करून दिले आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाने सरत्या वर्षांत ६९ पर्यंतची घसरगुंडी नोंदवली आहे.

मुंबईच्या सराफा बाजारात तोळ्यासाठी सोन्याचे दर शुक्रवारी २७,९०० रुपयांवर स्थिरावले. वर्षांरंभी सोने २४,९८० रुपये प्रति १० ग्रॅम होते. या दरम्यान त्यात २,९२० रुपयांची भर पडली आहे. तर वर्षांच्या सुरुवातीला किलोसाठी ३३,५६५ रुपयांचा दर अखेरच्या टप्प्यात ६,३६५ रुपयांनी वाढून किलोमागे ३९,९३० रुपयांवर पोहोचला आहे. पांढऱ्या धातूतील परतावा तब्बल १५.९४ टक्के नोंदला गेला आहे.

२०१६ मध्ये युरोपच्या बाजारात सोने दर प्रति औन्स ९ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे या महत्त्वाच्या बाजारात मौल्यवान धातूने गेल्या तीन वर्षांतील परताव्यातील घसरण थोपविली आहे. लंडनच्या बाजारात सोने आता १,१५० डॉलर प्रति औन्सवर येऊन ठेपले आहेत.

२०१६ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने चांगलीच धडकी भरविली. कधी अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक, अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हचे पतधोरण तर कधी खनिज तेलाचे प्रति पिंप ५० डॉलरपुढे भडकणारे दर यामुळे डॉलर वर्षभरात भक्कम होत गेला. परिणामी रुपयावरील दबाव २०१६ मध्ये ६९ नजीकच्या तळाला गवसणी घालणारे ठरले. २०१६ मधील अखेरच्या दिवशी, शनिवार, ३१ डिसेंबर रोजी सराफा बाजार सुरू राहणार असला तरी परकी चलन मंचावरील व्यवहारांचा शुक्रवार हाच शेवटचा दिवस होता.

दिवसअखेर ६७ पर्यंत भक्कम होणारा स्थानिक चलनाने वर्षभरात १७७ पैशांची म्हणजेच २.६८ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या वर्षांत रुपया २४ नोव्हेंबर रोजी ६८.८६ हा तळ नोंदविणारा ठरला. ३१ डिसेंबर २०१५ रोजी रुपया ६६.१५ वर होता.