कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच ईपीएफ खात्यांसंदर्भातील काही आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. देशभरामध्ये घसघशीत वेतन घेणाऱ्या व्यक्तींच्या नावे पीएफ खात्यांमध्ये ६२ हजार ५०० कोटी रुपये आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एक अशीही व्यक्ती आहे जिच्या पीएफ खात्यामध्ये १०३ कोटी रुपये आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये वर्षाला पीएफ खात्यांमध्ये अडीच लाखांहून अधिक रुपयांचे योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागणार आहे.

अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागातील सुत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच ईपीएफमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या साडेचार कोटी इतकी आहे. यापैकी ०.३ टक्के म्हणजेच १.२३ लाख खातेदार हे देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्यांपैकी आहेत. हे खातेदार दर महिन्याला आपल्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करतात.

अधिव्या व्याज मिळवणाऱ्यांवर कर लावण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत नोंदवत एका अधिकाऱ्याने जास्त वेतन असणाऱ्या लोकांच्या पीएफ खात्यांवर सध्या एकूण ६२ हजार ५०० कोटी रुपये जमा असून या पैशांवर करमाफी आणि ८ टक्के निश्चित व्याजही दिलं जात आहे. हा लाभ या श्रीमंत व्यक्तींना साधारण कमाई असणाऱ्या आणि अन्य करदात्यांच्या पैशांच्या आधारे मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीच्या नावार १०३ कोटी रुपये जमा असून इतर दोन व्यक्तींच्या नावावर प्रत्येकी ८६ कोटी रुपये जमा आहेत.

ईपीएफचा लाभ घेणाऱ्या २० सर्वाधिक कमाई असणाऱ्या व्यक्तींच्या खात्यावर एकूण ८२५ कोटी रुपये जमा आहेत. याचबरोबर जास्त कमाई करणाऱ्या १०० लोकांच्या एचएनआय खात्यांवर दोन हजार कोटींहून अधिक रक्कम जामा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेला कर आकारण्याचा प्रस्ताव हा पीएफमध्ये योगदान देणाऱ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी असल्याचंही सुत्रांनी म्हटलं आहे. निश्चित व्याज मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पीएफमध्ये पैसे गुंतवणाऱ्यावर चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचएनआय खात्यांमध्ये योगदान देणाऱ्या ईपीएफ खातेधारकांची संख्या ०.२७ टक्के इतकी आहे. या खात्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावे ५.९२ कोटी रुपये आहेत. निश्चित व्याजदराच्या आधारे या लोकांना दर वर्षी ५० लाख ३० हजारांचा नफा मिळतो. मात्र आता यापुढे अडीच लाखांहून अधिक निधी पीएफ खात्यावर एका वर्षात जमा होत असेल तर त्यावर कर द्यावा लागणार आहे. या नवीन नियमामुळे एक लाख २० हजार खातेदारांना आता पीएफच्या खात्यावर कर द्यावा लागणार आहे.