देशाच्या ग्राहक बाजारपेठा पुन्हा मागणीने फुलू लागल्याचे प्रत्यंतर, सहामाही उच्चांक पदाला पोहोचलेल्या देशाच्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलनाने दिले. सरलेल्या सप्टेंबरमध्ये ते ९५,४८० कोटी रुपये नोंदविले गेल्याचे अर्थ मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर २०१९च्या तुलनेत जीएसटी संकलन चार टक्क्यांनी वाढले आहे. तर जुलै २०२० च्या तुलनेत कर संकलनात तब्बल १० टक्क्यांची उत्साहवर्धक वाढ दिसून आली आहे. ऑगस्टच्या कर संग्रहणात, वार्षिक ५ कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या लघुउद्योगांना मे, जून आणि जुलैमधील उलाढालीसाठी भरलेला कर समाविष्ट केला गेला असल्याने, त्या महिन्याचे आकडे तुलनेसाठी ग्राह्य़ धरलेले नाहीत. मात्र ५ कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योग-व्यवसायांसाठी अशी कोणतीही मुदतवाढ दिली गेलेली नव्हती.

करोनाने उद्योग-व्यवसायांवर साधलेले दुष्परिणाम पाहता तुलनात्मक वेध म्हणून नव्हे, पण चालू आर्थिक वर्षांतील सप्टेंबरचे हे संकलन सर्वोच्च ठरले आहे. एप्रिल २०२० मध्ये ३२,१७२ कोटी रुपये, मेमध्ये ६२,१५१ कोटी रुपये, जूनमध्ये ९०,९१७ कोटी रुपये, जुलैमध्ये ८७,४२२ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये ८६,४४९ कोटी रुपये असे जीएसटी संकलन राहिले आहे.