सामान्य विमा क्षेत्रातील देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यांमध्ये वाढीसाठी केलेल्या मागणीला विमा नियामक ‘आयआरडीए’ने मंजुरी दिली असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. २००७ सालापासून जैसे थे पातळीवर असलेले हे हप्त्याचे दर हे आगामी महिन्यांपासून सरासरी २० टक्के दराने वाढविले जाणे अपेक्षित आहे. न्यू इंडिया या क्षेत्रातील अग्रणी असल्याने आरोग्यविमा क्षेत्रातील अन्य सरकारी कंपन्यांकडून या दरवाढीचे अनुकरण ताबडतोबीने केले जाऊ शकेल. गेल्या काही वर्षांत ज्या प्रमाणात आरोग्यनिगा व वैद्यक उपचाराचा खर्च वाढला आहे, त्या प्रमाणात आरोग्यविम्यासाठी हप्त्याच्या दरात वाढ तर सोडाच २००७ सालापासून त्यात बदलही करण्यात आलेले नाही, असे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन यांनी सांगितले. नूतनीकरण होत असलेल्या पॉलिसींना फेररचित हप्त्यांचा दर ताबडतोबीने लागू होणार नसला तरी नव्या पॉलिसींबाबत तो आगामी महिन्यापासूनच अमलात आणला जाऊ शकेल. विमेदाराची एकूण आरोग्य स्थिती आणि तो राहत असलेले शहर, यानुसार हप्त्यांचा दर साधारण २० टक्के अधिक पडेल, असे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
प्रलंबित एक लाख दाव्यांचे सत्वर निवारण
* चालू आर्थिक वर्षांदरम्यान एकूण दोन लाख प्रलंबित दाव्यांपैकी निम्मे म्हणजे एक दाव्यांचे सत्वर निवारण करण्याचे ठोस नियोजन आखण्यात आले असल्याचे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. हे सर्व विमाविषयक दावे हे मोटार-अपघाताशी संलग्न असल्याचे नमूद करीत, दावेदारांची बाजू ऐकून घेऊन विम्याची रक्कम अदा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नफ्यात पाच पटींनी वाढ
* न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने २०१२-१३ मध्ये गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजे रु. ८४३.६६ कोटींचा नफा कमावणारी कामगिरी केली. त्या आधीचे वर्ष कंपनीसाठी खूपच खडतर राहिले असले तरी त्या वर्षांतील रु. १७९.३१ कोटींच्या तुलनेत यंदाचा नफा तब्बल पाच पटींनी अधिक आहे. कंपनीने चालू वर्षांत १५,००० कोटींचे म्हणजे एकंदर व्यवसायात २० टक्के वाढीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. २०१२-१३ मध्ये कंपनीचा जागतिक व्यवसाय १८ टक्क्यांनी वाढून १२,५०५ कोटींवर गेला आहे. विदेशात २२ देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय फैलावला असून, त्यायोगे गेल्या वर्षी कंपनीने रु. २४६७ कोटींचे हप्त्यांपोटी उत्पन्न कमावले.