05 March 2021

News Flash

कर विवरणपत्रात चूक झाल्यास काय ?

सुधारित विवरणपत्र म्हणजे काय?

प्रातिनिधिक छायाचित्र

|| अर्चित गुप्ता

तुम्ही प्राप्तीकर विवरणपत्र भरले आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आले की विवरणपत्र भरण्यात एक चूक झाली आहे, तर काय होईल. ही चूक काहीही असू शकते. वैयक्तिक माहिती उघड करण्यात झालेली चूक असू शकते, बँकेच्या तपशिलातील चूक असू शकते, उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड न करणे असू शकते किंवा उत्पन्नाच्या रकमा चुकीच्या भरल्या जाणेही असू शकते. असे झाल्यास नेमके काय करायचे हे तुम्हाला कळत नाही. काळजी करू नका. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्राप्तीकर विभाग तुम्हाला सुधारित विवरणपत्र भरण्याची मुभा देतो. सुधारित विवरणपत्र म्हणजे काय हे अधिक तपशिलात समजून घेऊ .

सुधारित विवरणपत्र म्हणजे काय?

जेव्हा सादर केलेल्या मूळ विवरणपत्रात काही चूक असल्याचे करदात्याच्या लक्षात येते किंवा त्याला चुकीची माहिती वगळायची असते किंवा काही अतिरिक्त माहिती द्यायची असते, तेव्हा या सगळ्या बदलांसह भरलेल्या विवरणपत्राला सुधारित विवरणपत्र असे म्हणतात.

सुधारित विवरणपत्र भरण्यास पात्र कोण?

सर्वप्रथम, सुधारित विवरणपत्र भरण्यासाठी करदात्याने मूळ विवरणपत्रात काहीतरी चूक केलेली असावी लागते.

उदाहरणार्थ, करदाता गृहकर्जासाठी मासिक हप्ता भरत आहे; पण त्यावरील व्याज आणि मुद्दलाच्या काही भागावर मिळणाऱ्या करकपातीसाठी दावा करण्यास विसरला आहे. अशा परिस्थितीत तो त्या सर्व करकपातीवर दावा सांगत सुधारित विवरणपत्र भरू शकतो आणि त्याचे करपात्र उत्पन्न व पर्यायाने करदायित्व खाली आणू शकतो.

पूर्वी म्हणजे आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत केवळ दिलेल्या मुदतीत मूळ विवरणपत्र भरणाऱ्यांनाच सुधारित विवरणपत्र भरण्याची परवानगी होती. मात्र आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून मुदत उलटल्यानंतर भरलेल्या विवरणपत्रातही काही चुका राहिल्यास त्यासाठी सुधारित विवरणपत्र भरता येतात.

शिवाय, सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेतही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर दोन वर्षांच्या आत सुधारित विवरणपत्र सादर करण्याची परवानगी होती. आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी दिलेली कालमर्यादा कमी करून संबंधित आर्थिक वर्ष संपल्यापासून एक वर्ष करण्यात आली आहे.

यावरून, सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी मुदत ही संबंधित आर्थिक वर्षांसाठी मूल्यांकन वर्षांतील ३१ मार्च ही असेल. प्राप्तिकर विवरणपत्र १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळासाठी म्हणजेच आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी भरले गेले हे लक्षात घेता येथे संबंधित मूल्यांकन वर्ष हे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ हे अर्थात आर्थिक वर्ष २०१८-१९ असेल. म्हणून सुधारित विवरणपत्र ३१ मार्च २०१९ पूर्वी कधीही भरले जाऊ  शकेल.

येथे आणखी एक बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे केवळ सादर झालेल्या विवरणपत्रांसाठी नव्हे, तर प्राप्तीकर विभागाने प्रक्रिया केलेल्या विवरणपत्रासाठीही सुधारित विवरणपत्र सादर करता येते. फक्त ते दिलेल्या कालमर्यादेत भरले गेले पाहिजे.

मूळ विवरणपत्र सादर करणे व सुधारित विवरणपत्र सादर करणे यातील फरक

सुधारित विवरणपत्र हे मूळ विवरणपत्र सादर केले तिच प्रक्रिया पार पाडून केवळ त्यात आवश्यक ते बदल करून, सादर केले जाते.

तुम्हाला सुधारणा करणे आवश्यक वाटते ती माहिती सुधारून किंवा अतिरिक्त माहिती भरून त्याचवेळी सुधारित विवरणपत्र हे प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ (५) अन्वये सादर करणे आवश्यक आहे. सुधारित प्राप्तिकर विवरणपत्राचा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सादर केलेल्या मूळ प्राप्तिकर विवरणपत्राचे काही तपशील देण्यास सांगितले जाते. जसे – पावतीचा क्रमांक आणि मूळ विवरणपत्र सादर केले ती तारीख.

विवरणपत्रात किती वेळा सुधारणा करता येते?

मूळ विवरणपत्रासाठी किती सुधारित विवरणपत्रे सादर करायची याच्या संख्येवर काहीच मर्यादा नाही. मात्र, ही सर्व सुधारित विवरणपत्रे दिलेल्या मुदतीत सादर झाली पाहिजेत. सुधारित विवरणपत्र सादर करताना प्रत्येक वेळी मूळ विवरणपत्राचे तपशील देणे आवश्यक आहे. अर्थात, सुधारित विवरणपत्र खूप वेळा सादर करू नये. तुम्हाला विवरणपत्रात भरावयाच्या तपशिलांबाबत काही शंका असेल, तर तज्ज्ञ व्यक्तीशी बोलून ती दूर करून घेऊन मगच विवरणपत्रात माहिती भरणे योग्य.

सुधारित विवरणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे का?

याचे उत्तर होय असे आहे. सुधारित विवरणपत्र भरण्याची आणि त्याची पडताळणी करवून घेण्याची प्रक्रिया मूळ विवरणपत्रासाठी असते तिच आहे. त्यामुळे प्रत्येक सुधारित विवरणपत्राचे ई-व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या पद्धतींच्या यादीपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून ‘इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड’ अर्थात ‘ईव्हीसी’ मिळवून ‘ई व्हेरिफिकेशन’ केले जाऊ  शकते. या यादीत नेट बँकिंग, आधार कार्ड, डिमॅट खाते, एटीएम किंवा ओटीपी यांचा समावेश होतो.  याला पर्याय म्हणून आयटीआर व्हीची प्रत्यक्ष प्रत (फिजिकल कॉपी) बेंगळुरू येथील सीपीसीलाही पाठवता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:24 am

Web Title: how to file income tax return
Next Stories
1 SBI मध्ये महत्वपूर्ण बदल, १३०० शाखांचे बदलले IFSC कोड
2 Bogus Pan Card : 25 हजार पगार असलेला सेल्समन 13 कंपन्यांचा संचालक, 20 कोटींचे व्यवहार
3 कारभार सुधारा, नाही तर अस्तंगत व्हा!
Just Now!
X