माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवा पुरविणाऱ्या क्षेत्राने चालू आर्थिक वर्षांत १०० अब्ज डॉलरचा एकूण महसुलाचा आकडा विक्रमी वेळेत म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये पार केला आहे. यंदा एकूणच मंदीचे वातावरण असतानाही या क्षेत्राचा विकास दर हा १२ ते १४ टक्के एवढा असेल, असे मत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था म्हणून काम करणाऱ्या नासकॉमतर्फे  मंगळवारी व्यक्त करण्यात आले.
मुंबईमध्ये बुधवारपासून तीन दिवस नासकॉमचे वार्षिक अधिवेशन होत असून त्या निमित्ताने नासकॉमने ही माहिती दिली. एक अब्ज ते १०० अब्ज डॉलर हा महसुलाचा पल्ला या क्षेत्राने केवळ दोन दशकांमध्ये गाठला आहे, ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे नासकॉमचे अध्यक्ष सोम मित्तल यांनी सांगितले. ते म्हणाले की, निर्यातीतून मिळणारे उत्पन्नही यंदा घसघशीत वाढलेले दिसेल. एकूणच जगभरात मंदीसदृश्य वातावरण असले तरी एकूणच माहिती तंत्रज्ञानावरील खर्चात मात्र बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळेच तेवढय़ा संधीही निर्माण झाल्या आहेत.
केवळ निर्यातीच्याच माध्यमातून हा महसुल वाढणार नाही तर देशांतर्गत बाजारपेठेतील परिस्थितीही तेवढीच स्वागतार्ह आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्येही या क्षेत्राचा विकास दर हा १३ ते १५ टक्क्यांच्या आसपास राहील. तर त्या माध्यमातून मिळणारा महसूल हा १.१८ ते १.२० दशलक्ष कोटी रुपयांच्या आसपास असेल. गेल्या वर्षभरात मंदीचे वातावरण असतानाही भारतीय कंपन्यांनी कोणतीही कच खालेल्ली नाही. त्याचाच फायदा त्यांना हा मंदीचा फेरा काहीसा ढिला झाल्यानंतर झाला, असे नासकॉमचे सरचिटणीस एन. चंद्रशेखर यांनी सांगितले.
आजही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यांसाठी अमेरिका आणि युरोप हीच मोठी बाजारपेठ आहे. या आर्थिक वर्षांत या दोन्ही मोठय़ा बाजारपेठांमधील आपली कामगिरी महसुलाच्या बाबतीत १०.२ टक्क्यांनी वाढलेली असेल. आर्थिक मंदीच्या वातावरणात ही टक्केवारी दिलासादायकच आहे.
भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही तीन दशलक्षांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या वर्षी आणखी एक लाख ८० हजार कर्मचाऱ्यांची भर त्यात पडली आहे, असेही नटराजन म्हणाले.