कोरियन बनावटीच्या ह्य़ुंदाई कंपनीने आय२० अ‍ॅक्टिव्ह ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणीतील स्पोर्टी लूक असलेली प्रवासी कार कंपनीच्या भारतातील व्यवसाय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. सिओ यांनी मंगळवारी नवी दिल्लीनजीक गुरगाव येथे सादर केली. कारची किंमत ६.३८ ते ७.०९ (पेट्रोल) व ७.६३ ते ८.८९ (डिझेल) लाख रुपये दरम्यान असेल. टोयोटाची इटिऑस क्रॉस, फोक्सव्ॉगनच्या क्रॉस पोलोसह तिची स्पर्धा असेल.

भारतात गेल्या दोन दशकांपासून असलेल्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाने प्रवासी कार विक्री क्षेत्रातील दुसरे स्थान मिळविले आहे. कंपनी वर्षांला ४० लाख वाहने बनविते. नव्या वाहनांच्या दिमतीवर कंपनीने चालू वर्षांसाठी वार्षिक ६० लाख वाहन उत्पादनाचे उद्दिष्ट राखले आहे. वाहन विक्रीतील वार्षिक वाढही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के अधिक राहण्याचा विश्वास सिओ यांनी व्यक्त केला आहे. कंपनी तिची एसयूव्ही श्रेणीतील नवे वाहनही येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सादर करण्याची शक्यता आहे.