सोय उपलब्ध करून दिली की माणसे त्याचा फायदा घेतातच. सुमारे ५० वर्षांपूर्वी आमच्या जामसंडे गावी प्रथमच एक फोटो स्टुडिओ सुरू झाला. इथे कोण फोटो काढायला येणार असे सुरुवातीला म्हणणाऱ्या मंडळींचा भ्रमनिरास झाला तो असा की मजूर माणूसदेखील थोडे पसे साठवून (त्याकाळी दोन रुपये!) आपला फोटो काढून घेऊ लागला. अपवाद का होईना एखाद्या बँकेचा शाखा व्यवस्थापक पुढाकार घेऊन काही करू म्हणेल तर त्याला प्रोत्साहन मिळेलच याची शाश्वती नसते.
काही वर्षांपूर्वी एका सहकारी बँकेच्या शाखाधिकाऱ्याने डिमॅट मेळावा भरवून डिमॅट खाती उघडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यासाठी बँकेवर कसलाही अíथक भार पडणार नव्हता. तरी पण त्या शाखाधिकाऱ्याला हेड ऑफिसकडून शाबासकी तर दूरच राहिली पण आम्हाला न सांगता असले उपद्व्याप का केले म्हणून तंबी! ही घडलेली घटना आहे. झारीतले शुक्राचार्य म्हणतात ते हे असे! स्वत: काही करायचे नाही दुसऱ्याला करू द्यायचे नाही. मध्यंतरी एक बडय़ा अर्थसंस्थेने आयोजित केलेल्या गुंतवणूकदार मेळाव्याला हजर राहण्याचा योग आला. आधी म्हटल्याप्रमाणे जसे बचत खाते तसेच डिमॅट खाते इतकी ही सोपी संकल्पना न सांगता त्या संस्थेच्या अधिकाऱ्याने डिमॅटची व्याख्या सांगायला सुरुवात केली. ती देखील इंग्रजीत बरे का! ती व्याख्या ऐकून अध्र्या अधिक लोकांचा असा समज झाला असावा की आधी ही डिमॅटची व्याख्या पाठ करायला पाहिजे तरच मला डिमॅट खाते उघडता येईल! उरलेल्या अध्र्या लोकांना वाटले असेल की हे डिमॅट वगरे माझ्यासाठी नाहीच. ती भन्नाट व्याख्या अशी होती : Dematerialization is a process by which shares held by investor in physical certificate form are converted into electronic form where they lose their distinctive characteristics and become fungible subject to a right of investor to get the said shares again converted into  physical certificate form provided an investor applies to that effect in prescribed format… आता हे असले काहीतरी ऐकून कोण हरीचा लाल डिमॅट खाते उघडायला प्रवृत्त होईल बरे. बोलणारे बोलत जातात ऐकणारे बिचारे ऐकत असतात. पण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकातील अंतू बर्वा म्हणतो त्याप्रमाणे ‘याचा त्यास उपयोग नाही त्याचा यास उपयोग नाही!’ बँकांच्या बाबतीत जितके बोलू तितके कमी. अनेक बँकातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना डिमॅट खात्यावरील वार्षकि शुल्क माफ असते. अनेक बँकात निवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा अध्रे माफ असते. मात्र ही माहिती फारच कमी लोकांना उपलब्ध करून दिली जाते. तसे पाहिले तर सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी जरी आपापली स्वतची डिमॅट खाती उघडली तरी ती संख्या काही लाखांच्या घरात जाईल.
शेअर बाजार किती सोपा आहे, किती सुरक्षित आहे, किती पारदर्शक आहे ही माहिती ग्राहकांना तसेच कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी सध्या बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, सारस्वत बँक त्यांच्या शाखातून मेळावे भरवतात. इतर बँकानी त्यांचे अनुकरण का करू नये? सीडीएसएल तर त्यासाठी सदैव तत्पर असते. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे या निश्चयाने जसे शिवाजी महाराजानी कार्य आरंभले तसे जर का बँका ठरवतील व त्याप्रमाणे कामाला लागतील तर हा हा म्हणता १२२ कोटी लोकसंख्या आणि दोन कोटी डिमॅट खाती हे चित्र बदलून जाईल.
वस्तुस्थिती अशी आहे की बँकांच्या शाखांचे जेवढे जाळे देशभर पसरले आहे तितके कुठल्याही ब्रोकरचे नाही. जितका शेअर ब्रोकर डीपी सुरक्षित तितकाच बँक डीपी सुरक्षित ही वस्तुस्थिती असूनही लोकांना बँकच जास्त जवळची वाटते हे लक्षात घेतल्यास बँकांची जबाबदारी जास्त आहे. कणकवलीसारख्या गावात बँक ऑफ बडोदा शाखा उघडून आहे पण शेअरखानसारखा ब्रोकर कणकवलीत सहसा शाखा उघडणार नाही, हे तर खरे ना?