करोनासाथप्रसार-टाळेबंदीसदृश निर्बंधांचा विपरीत परिणाम

नवी दिल्ली : करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका देशातील औद्योगिक निर्मितीला बसला आहे. भारताची या क्षेत्राची कामगिरी गेल्या आठ महिन्यांच्या सुमार स्थितीत नोंदली गेली आहे.

याबाबतचा भारताचा आयएचएस मार्किट निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक यंदाच्या एप्रिलमध्ये ५५.५ अंश राहिला आहे. मार्चमधील ५५.४ अंश तुलनेत यंदा तो काहीसा उंचावला असला तरी गेल्या आठ महिन्यांत तो सर्वात कमी आहे.

देशातील उद्योग क्षेत्राकडून होणाऱ्या निर्मित वस्तूंसाठीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी यंदा रोडावली आहे. ती यंदा सलग आठव्या महिन्यात कमी झाली आहे. ऑक्टोबर २०२० पासून वेगानी खाली येत आहे. त्याचबरोबर निर्मिती क्षेत्रातील रोजगारातही गेल्या काही महिन्यांमध्ये घसरण झाली आहे. याबाबतचे प्रमाण हे गेल्या तब्बल १३ महिन्यांतील किमान स्थानावर आहे.

निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक ५० अंश असा समाधानकारक मानला जातो.

एप्रिलमधील हा निर्देशांक निर्मित वस्तूची मागणी तसेच उत्पादन कमी झाल्याने रोडावल्याचे आयएचएस मार्किटच्या अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी संचालक पॉलिआना डि लिमा यांनी म्हटले आहे. करोना साथीचा वाढता प्रसार तसेच निर्बंध यामुळे हा निर्देशांक येत्या कालावधीत आणखी खाली येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. निर्मिती क्षेत्राला सद्य:स्थितीत भेडसावणारी आव्हाने दुर्लक्षून चालणार नाही; जागतिक स्तरावर वाढणाऱ्या किमतीमुळे येथील उद्योगांना वित्तीय स्तरावरही लढा द्यावा लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.