मुंबई : जागतिक भांडवली बाजारात अस्थिरता असूनही भारतीय भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची कामगिरी उत्साहवर्धक राहिली असल्याचे मत सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) नवव्या वित्तीय बाजार परिषदेत ते बोलत होते. उद्योग संघटनेचे नियुक्त उदय कोटक हेही यावेळी उपस्थित होते.

अमेरिका-चीन व्यापार तणाव, खनिज तेलाच्या अस्थिर किंमती आदींमुळे जागतिक भांडवली बाजारांमधील अस्वस्थतता पुढील वर्षीही कायम राहण्याची शक्यता त्यागी यांनी व्यक्त केली. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत मात्र भारतातील प्रमुख निर्देशांकांची कामगिरी उत्तम असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ब्रिटन, चीन, ब्राझील, जपान आदी देशांमधील प्रमुख निर्देशांकांसमोर भारतातील निफ्टी निर्देशांकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान ६.५ टक्के वाढ नोंदविल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. भारतीय रुपयाची एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानची डॉलरच्या तुलनेतील ७ टक्के घसरण ही जपान, चीन, ब्रिटन तसेच ब्राझील देशांच्या चलनांच्या तुलनेत कमीच आहे, असेही ते म्हणाले.

रोकड चणचणीबाबत भांडवली बाजार नियामक म्युच्युअल फंड उद्योगाबरोबर चर्चा करत असून सप्टेंबपर्यंत असलेली याबाबतची चिंताजनक स्थिती आता सावरल्याचेही त्यांनी सांगितले. ती यापुढेही प्रगती करेल, असे ते म्हणाले.